Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातात दोघे ठार; ट्रकची टेम्पोला जबर धडक ,चॅनल १०८ जवळील घटना
esakal March 28, 2025 07:45 AM

धामणगावरेल्वे : तालुक्यातील वाढोणा गावाजवळ आयशर ट्रक उभ्या टेम्पोवर जाऊन धडकला. त्यात एक वाहन उलटले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक १०८ जवळ ही घटना घडली.

उभ्या असलेल्या टेम्पोला ट्रकने मागून धडक दिली. अपघाताच्या वेळी सदर टेम्पोचे टायर बदलविण्याचे काम सुरु होते. मृतांमध्ये चालक व वाहकाचा समावेश आहे. बुधवारी (ता.२६) ही घटना घडली. भिवंडी येथून नागपूरच्या दिशेने टेम्पो क्रमांक एम .एच.०४- जे यु.३२०८ यात काही सामग्री भरून जात होता.

समृद्धी महामार्गावर वाढोणा गावाजवळ टेम्पोचा टायर खराब झाल्याने टायर बदलाविण्याचे काम सुरु होते. हे काम आसाम येथील बिलाल अहमद (वय ३०) व संतोषकुमार रामपाती करीत होते.

दरम्यान मागून येणाऱ्या एम. एच.१२- एम.व्ही. ५६३० या क्रमांकाच्या ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिल्याने चालक बिलाल अहमद (वय ३०), संतोष कुमार रामपाती यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ठाणेदार रामेश्वर धोंडगे, महामार्ग पोलिस प्रभारी माया चाटसे व त्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतकांना धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

तसेच ट्रक व टेंम्पो क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. आयशर ट्रक क्रमांक एम.एच.१२-एम.व्ही.५६३० चा चालक युवराज भाऊसाहेब ढोले (वय ३०, रा. भोसे, ता. कर्जत जि.अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तळेगाव दशासर पोलिस करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.