औरंगजेब कबरीच्या वादानंतर नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम छत्रपती संभाजीनगरात दाखल झाली आहे. यासोबतच मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीर याठिकाणी देखील एनआयएची टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करीत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या एका टीमने छत्रपती संभाजीनगर शहर, खुलताबाद परिसराची पाहणी केली. शिवाय मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, जवळ असलेल्या विदर्भातील बुलडाणा या जिल्ह्यातही हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. औरंगजेब कबरीच्या पार्श्वभूमीवर दंगल किंवा तेढ उद्भवेल असं कोणी काम करतंय का? यावर एनआयएच्या टीमचे बारीक लक्ष असणार आहे.
विशेषतः ज्या जिल्ह्यात, शहरात दंगलीची पार्श्वभूमी आहे त्याठिकाणी तपास यंत्रणेनेककडून रेकी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील एनआयएची पथके गेले आहेत. तेथील संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी स्थानिक एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे.