वसई किल्ल्यावर
स्वच्छतामोहीम
खेडः मावळे आम्ही स्वराज्याचे या संघाने वसई किल्ल्यावर स्वच्छतामोहीम राबवली. यामध्ये मावळे आम्ही स्वराज्याचे, राजधानी ट्रेकर्स, नाद सह्याद्री ट्रेकर्स, शिवशौर्य परिवार अशा ४९ जणांच्या चमूने जंगलाच्या विळख्यात सापडलेले किल्ल्याच्या आतील दोन बुरूज साफसफाई करून मोकळे केले. सकाळी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मोहीम सुरू झाली. ध्येयमंत्र व शिवगर्जना करत सर्वांनी उत्साहात या मोहिमेत सहभाग नोंदवला. यात कोमल माने, प्राची रावराणे, धनंजय कोंबे, सचिन दोन्हे, ज्योत्स्ना माने, सिद्धेश बड़मे, सुमित कुशे, तेजस बावकर, सुशांत परब, संतोष चव्हाण, शुभम गांगण, कौशल पाटेकर, रिंकल पाटेकर, साहिल डाफळे, वर्षा कदम आदींनी सहभाग घेतला होता.
-------------
जिल्हाधिकाऱ्यांकडून
तीन स्थानिक सुट्ट्या
रत्नागिरी ः जिल्हाधिकारी एम. देवंदर सिंह यांनी आपल्या अधिकाराखाली २०२५ मध्ये तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त तीन सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी २०२५ या वर्षासाठी नारळीपौर्णिमा सणानिमित्त ८ ऑगस्ट, ज्येष्ठा गौरी विसर्जनासाठी २ सप्टेंबर आणि नरक चतुर्दशी (अभ्यंगस्नान) २० ऑक्टोबर अशा तीन सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
--------
नाचणे ज्येष्ठ नागरिक
संघ वर्धापन उत्साहात
रत्नागिरी ः नाचणे ज्येष्ठ नागरिक संघाचा अकरावा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. संस्थेचे विद्यामान कार्यकारिणी मंडळ पुढील तीन वर्षासाठी नियुक्त करण्यात आले. या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ सदस्यांनी संस्थेचा ११ वा वाढदिवस संस्थाच्या नामफलकास पुष्पहार घालून साजरा केला. वर्धापनदिनाचे औचित्य साधून संस्थाच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रत्येक सदस्यांनी योगदान देण्याचे ठरविले. या वेळी अध्यक्ष वसंत झगडे, उपाध्यक्ष रोहणी डोंगरे, कार्याध्यक्ष चंद्रकांत नार्वेकर, सचिव दत्तात्रय चाचले, खजिनदार श्रीकांत मांडवकर, सहसचिव जनार्दन निकम आदी उपस्थित होते.