नवी दिल्ली : पंजाबच्या शंभू आणि खनौरी सीमेवरचे केंद्र सरकारविरुद्धचे शेतकऱ्यांचे आंदोलन केंद्र आणि पंजाब सरकारने हातमिळवणी करून मोडीत काढल्याचा आरोप आंदोलक करीत आहेत.
आंदोलन संपविण्यासाठी केंद्र आणि पंजाबच्या सरकारमध्ये सौदेबाजी झाल्याचा संशय शेतकरी नेते तसेच काँग्रेस पक्ष व्यक्त करत आहेत. लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीपोटी आम आदमी पक्षाच्या सरकारने आंदोलन संपविल्याचा दावाही करण्यात येत आहे.
लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ‘आप’चा संभाव्य पराभव टाळण्यासाठी भगवंत मान सरकारने आंदोलनावर कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही सीमांवरील वाहतूक तेरा महिन्यांपासून ठप्प झाल्यामुळे व्यापारी नाराज आहेत. सीमा खुल्या केल्या नाही तर या पोटनिवडणुकीत ‘आप’ला मतदान करणार नसल्याचा व्यापाऱ्यांनी इशारा दिल्याचे समजते.
त्यामुळे शेतकऱ्यांविरुद्ध कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांचा संघर्ष केंद्राशी आहे. त्यांनी दिल्लीला जाऊन आंदोलन करावे. शंभू आणि खनौरी सीमा ठप्प झाल्यामुळे पंजाबचा व्यापार आणि वाहतूक बाधित होत असल्याची भूमिका पंजाब सरकारने घेतली आहे. पश्चिम लुधियाना मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची अजून घोषणा झालेली नसली तरी ‘आप’ने राज्यसभेचे सदस्य संजीव अरोरा यांच्या उमेदवारीची घोषणा केली. अरोरा विजयी झाल्यास केजरीवाल यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग प्रशस्त होणार असल्याचे म्हटले जात आहे.
बुलडोझर कारवाईकृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि ग्राहक संरक्षण व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत हमी भावाच्या मुद्यावर सातव्या फेरीची चर्चा करण्यासाठी चंडीगडला गेलेले शेतकरी नेते परत येत असताना पंजाब सरकारने आंदोलनस्थळी कारवाई केली. पंजाब पोलिसांनी शंभू आणि खनौरी सीमेवर शेकडो आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्या तंबूंवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आणि राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
दरम्यान शेतकऱ्यांच्या संघर्षात पंजाब सरकार आणि आम आदमी पक्ष विनाकारणमध्ये पडल्याची टीका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली. केंद्र आणि पंजाब सरकार मिळून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
केजरीवाल यांचे कारस्थान : भाजपपंजाबच्या ‘आप’ सरकारचा शेतकरी आणि केंद्र सरकारदरम्यानची चर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रवनीतसिंह बिट्टू यांनी केला. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असून पंजाबमध्ये मुक्काम करणारे केजरीवाल यांनी शेतकऱ्यांविरुद्ध कटकारस्थान केल्याचा आरोप बिट्टू यांनी केला.