इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे आता आयपीएलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आयपीएलच्या या १८ व्या हंगामात नव्या-जुन्या गोष्टींचा मेळ पाहायला मिळणार आहे. कारण या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन झालेलं असल्याने सर्वच संघात बदल झालेले आहेत. काही संघांचे तर कर्णधारही बदलले आहेत.
दरम्यान, २०२५ साठी बरेच जुनेच नियम लागू झालेले असले तरी काही महत्त्वाचे नियम यंदा नव्याने लागू करण्यात आले आहेत. काही जुने नियम पुन्हा सुरू करण्यात आलेत, तर काही नवीन नियम लागू झाले आहेत.
या नियमांबाबत सर्व संघांच्या कर्णधारांना २० मार्च रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत सांगण्यात आले आहे. याच नियमांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
आयपीएल २०२५ साठीचे महत्त्वाचे नियम लाळेचा उपयोगकोविड-१९ कालावधीपूर्वी हा नियम वापरात होता. मात्र कोविड आल्यानंतर साधवगिरी म्हणून लाळेचा उपयोग बंद करण्यात आला होता. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून मोहम्मद शमीसह अनेक गोलंदाज चेंडूला लाळ लावण्याची परवानगी मागत होते. यामुळे चेंडूला स्विंग आणि रिव्हर्स स्विंग देण्यासाठी गोलंदाजांना मदत होईल.
अखेर बीसीसीआयने हा नियम पुन्हा लागू केला आहे. लाळेच्या वापरावरील बंदी काढण्यात आली असून आता गोलंदाजांना फायदा घेता येणार आहे.
दोन चेंडूदुसऱ्या डावात आता संघांना दोन चेंडू घेता येणार आहेत. परंतु, त्यासाठीही काही नियम असतील. दवाचा खेळावर होणारा परिणाम पाहाता हा नियम लागू करण्यात आला आहे.
दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघाला १० व्या षटकानंतर नवीन चेंडू दिला जाऊ शकतो. यासाठी क्षेत्ररक्षण करणारा संघचा कर्णधार दवामुळे चेंडू बदलण्यासाठी पंचांकडे अपील करू शकतो. त्यावेळी पंचांना तशाच परिस्थिती असलेला दुसरा सुका चेंडू खेळात वापरण्यासाठी आणावा लागेल. यावेळी दुसरा चेंडू निवडण्याचे स्वातंत्र्य गोलंदाजी करणाऱ्या संघाला नसेल.
तसेच पंच चेंडूचा आकाराबाबत काही शंका असल्यास, चेंडू गहाळ झाल्यास किंवा खराब झाल्यास १० व्या षटकाआधीही चेंडू बदलू शकतात. तसेच जर ११ व्या षटकात कर्णधाराकडून चेंडूच्या आकाराबाबत तक्रार आली, तर चेंडू बदलण्याचा अंतिम निर्णय पंचांकडून घेतला जाणार आहे. हा नियम शक्यतो संध्याकाळच्या सामन्यावेळी अधिक वापरात येण्याची शक्यता आहे.
स्लो-ओव्हर रेट आणि डिमिरिट पाँइंट्सस्लो-ऑव्हर रेट म्हणजेच निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत, तर करण्यात येणाऱ्या कारवाईबाबतचे नियम बदलण्यात आले आहेत. यापूर्वी तीनवेळा झालेल्या चुकीनंतर कर्णधारावर एका सामन्याची बंदी लागत होती.
पण आता कर्णधाराला बंदी लागण्याऐवजी आता डिमिरिट पाँइंट्स देण्यात येणार आहेत आणि त्यानुसार आर्थिक दंड आकारण्यात येणार आहे, तसेच क्षेत्ररक्षणातील निर्बंध गेल्यावेळी प्रमाणेच कायम असणार आहेत.
दरम्यान, गेल्यावर्षी लागलेली बंदी मात्र या हंगामात कायम असेल, जी हार्दिक पांड्यावर लागलेली होती. त्याच्यावर ही बंदी गेल्यावर्षी लागलेली असल्याने तो चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही.
दरम्यान, बीसीसीआयने यंदा डिमिरिट पाँइंट्स सिस्टिम आणली आहे. डिमिरिट पाँइंट्स ३ वर्षांसाठी कायम राहणार आहेत. यात जर ४ ते ७ डिमिरिट पाँइंट्स झाले, तर खेळाडूवर एका सामन्याची, ८ ते ११ डिमिरिट पाँइंट्ससाठी २ सामन्यांची आणि १२-१५ डिमिरिट पाँइंट्ससाठी ३ सामन्यांची बंदी लागेल.
हॉक-आय तंत्रज्ञानऑफ स्टंपच्या बाहेरील आणि उंचीवरून जाणाऱ्या वाईड बॉलसाठी तसेच कंबरेच्या वर जाणाऱ्या नो-बॉलसाठी आता हॉक-आय तंत्रज्ञान वापर केला जाईल. त्यासाठी संघांना डीआरएस घेण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
इम्पॅक्ट प्लेअर नियमइम्पॅक्ट प्लेअर नियम गेली दोन हंगामात आयपीएलमध्ये वापरण्यात येत आहे. पण या नियमाबाबत बरेच वाद असून त्याबद्दल मतमतांतरेही आहेत. मात्र बीसीसीआयने २०२७ आयपीएलपर्यंत हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.