मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या घोषणेला पाठबळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात स्मारकासाठी तरतूद केल्याचे जाहीर केले.
पर्यटन विभागानेही आज या स्मारक उभारणीचा सविस्तर शासन निर्णय काढून या स्मारकाच्या कामाला गती देण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला नुकतीच ३९५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने आग्रा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आग्रा शहरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद करण्यात आले, ती वास्तू महाराष्ट्र शासनातर्फे अधिग्रहीत करून त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेच्या पूर्ततेसाठी शासन निर्णयाच्या माध्यमातून पावले उचलली जात आहेत.
हे स्मारक उभारण्यासाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासतज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अन्य कारणांसाठीची जबाबदारी पर्यटन विभागावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभुराजे यांची आग्रा येथून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांना करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.