सानिका मोजार आणि तन्मय जक्का
कलर्स मराठीवरील ‘लय आवडतेस तू मला’ या मालिकेत सानिका मोजार आणि तन्मय जक्का यांनी साकारलेल्या सरकार आणि सानिकाच्या भूमिकांना प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळतं आहे. या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी सुंदर आहे, तितकीच त्यांची ऑफस्क्रीन मैत्रीही गोड आहे. मालिकेच्या सेटवर सुरू झालेली ही ओळख आता एक घट्ट मैत्रीत रूपांतरित झाली आहे.
सानिका तिच्या आणि तन्मयच्या मैत्रीविषयी बोलताना सांगते, ‘‘आम्ही ‘लय आवडतेस तू मला’ मालिकेदरम्यान पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी आम्ही एकमेकांसाठी अनोळखी होतो. सुरुवातीला फक्त कामापुरतं बोलणं झालं; पण सीन्स करताना एकमेकांशी समन्वय साधत गेलो आणि आमच्यातली मैत्री हळूहळू घट्ट होत गेली. तन्मय खूप समजूतदार आहे आणि त्याला समोरच्याची काळजी घ्यायला आवडतं. मला त्याचा समजून घेण्याचा स्वभाव खूप आवडतो. आजच्या काळात प्रत्येकाला बोलायचं असतं; पण ऐकून घेणारे कमी असतात. तन्मयचं ऐकून घेणं आणि समजून घेणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.’’
सानिका पुढे सांगते, ‘‘अलीकडेच माझा वाढदिवस झाला. पहिल्यांदाच मी आई-बाबांपासून आणि कुटुंबीयांपासून लांब राहून वाढदिवस साजरा करत होते. त्यामुळे मी थोडी उदास होते; पण तन्मयने माझ्यासाठी केक घेऊन एक सुंदर सरप्राइझ दिलं. खरं सांगायचं तर मला त्याच्याकडून असं काही अपेक्षित नव्हतं; पण ते सरप्राइझ माझ्यासाठी खूप खास होतं. त्या क्षणी मला जाणवलं, की तन्मय केवळ एक सहकलाकार नाही, तर माझा खरा मित्र आहे.’’
तन्मय सांगतो, ‘‘आमच्या मैत्रीची सुरुवात एका गमतिशीर नोटवर झाली. सानिका खूप मेहनती आणि समर्पित मुलगी आहे. तिचं काम करण्याचं टेम्परामेंट खूप चांगलं आहे. ती सेटवर धडपडत असते; पण तिच्या त्या गोंधळात एक निरागसता असते. अनेकदा शूटिंगदरम्यान ती एखादी गोष्ट विसरते किंवा धडपडते. तिचा तो गोंधळ पाहून मला हसू येतं आणि मी तिची खेचायचा प्रयत्न करतो; पण तिच्या त्या निरागसतेवर माझं खूप प्रेम आहे.’’
सानिकाच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगताना तन्मय म्हणतो, ‘‘ती थोडीशी क्लम्झी आहे; पण तिची काम करण्याची पद्धत खूप समर्पित आहे. तिची मेहनत, चिकाटी आणि कामाविषयी असलेली तळमळ पाहून मला नेहमीच प्रेरणा मिळते. ती ज्या पद्धतीनं प्रत्येक सीन जिवंत करते, ते पाहून मला खूप आनंद होतो.’’
सानिका आणि तन्मयच्या मैत्रीविषयी त्यांच्या स्वतःच्या भावना खूपच खास आहेत. तन्मय म्हणतो, ‘‘माझ्यासाठी मैत्री म्हणजे काळजी. मित्रांसाठी मनापासून काळजी वाटणं, त्यांच्या अडचणींमध्ये त्यांच्यासोबत उभं राहणं हीच खरी मैत्री आहे.’’ सानिका म्हणते, ‘‘तन्मयसोबतची माझी मैत्री अशी आहे, की मला काही न बोलता त्याला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी समजतात. तो मला इतका ओळखतो, की अनेकदा कोणत्या परिस्थितीत मी काय बोलणार आहे, हे त्याला आधीच माहिती असतं आणि त्यानं त्यावर प्रतिक्रिया दिलेली असते. हे एकमेकांना समजून घेणं, पूर्णपणे ओळखणं यालाच मी खरी मैत्री मानते.’’