स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपवून घरी परतताना काळाचा घाला; दोन कारच्या भीषण अपघातात दांपत्य ठार, एकाच सरणावर दिला अग्नी
esakal March 22, 2025 01:45 PM

विकास भिकू मोहिते यांच्या शेजारच्या तोरसे कुटुंबातील एक मुलगी ताकारी येथे शिक्षण घेत आहे. तिच्या स्नेहसंमेलनाला ते आपल्या मोटारीतून (एमएच ४२, एएच १०४७) गुरुवारी गेले होते.

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील वाल्मीकनगर येथे जुन्या सांगली-सातारा रस्त्यावर दोन मोटारींमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Sangli-Satara Road Accident) पती-पत्नी जागीच ठार झाले, तर इतर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. विकास भिकू मोहिते (वय ४२) व पुष्पा विकास मोहिते (३८, रा. राममंदिराजवळ, खटाव, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी (ता. २०) रात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत चिंचणी (वांगी) (Chinchani Police) मिळालेली माहिती अशी की, विकास भिकू मोहिते यांच्या शेजारच्या तोरसे कुटुंबातील एक मुलगी ताकारी येथे शिक्षण घेत आहे. तिच्या स्नेहसंमेलनाला ते आपल्या मोटारीतून (एमएच ४२, एएच १०४७) गुरुवारी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर जेवण उरकून रात्री ११.४५ च्या दरम्यान पत्नी व इतरांसह वांगीहून गावी खटावकडे चालले होते.

याचवेळी जमीर इलाही आवटी (रा. महाबळेश्वर, जि. सातारा) हा महाबळेश्वरकडून कडेपूर-वांगी मार्गे सांगलीला मोटारीतून (एमएच ११ डीबी ५७९७) निघाला होता. वाल्मिकी नगर-वांगी येथे येताच जमीरच्या गाडीने मोहिते यांच्या मोटारीला जोराची धडक दिली.

या धडकेत विकास मोहिते व पत्नी पुष्पा मोहिते हे जागीच ठार झाले; तर त्याच चारचाकीतील ऋतुजा रोहित तोरसे (३६), विजया प्रकाश तोरसे (६५), आरोही रोहित तोरसे (११), आर्या अरुण तोरसे (१५) हे गंभीर जखमी झाले आहेत. चालक जमीर इलाई आवटी हाही जखमी झाला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.