सिन्नर- पतीकडून त्रास होऊ लागल्याने दोन आठवड्यांपासून आईकडे राहणाऱ्या विवाहितेचे तिच्या पतीनेच साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याची घटना पांगरी (ता. सिन्नर) येथे घडली. पत्नी व पती दोघेही एकाच गावातील आहेत. अपहरणानंतर वावी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शिर्डी येथून विवाहिता व तिच्या पतीला ताब्यात घेतले. अपहरणात वापरण्यात आलेली कार व तिघे फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
अपहरणाचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, विवाहितेचे अपहरण होत असताना अपहरण करणाऱ्या व्यक्तीने तिच्या आईला धक्काबुक्की केली. ही विवाहिता दोन आठवड्यांपासून आईकडे राहावयास आली होती. तिचा गावातील तरुणाशी तिचा प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये खटके उडत होते.
माहेरी आलेल्या पत्नीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तिच्या पतीने अपहरण केल्याची चर्चा आहे. १९ मार्चच्या दुपारी आई व मुलगी पांगरी बसस्थानक परिसरात जात असताना मागून आलेल्या कारमधील चौघांनी विवाहितेचे अपहरण केले.
वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय कोठावळे, हवालदार सतीश बैरागी, विक्रम लगड, चालक विक्रम टिळे यांनी अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. संगमनेरमार्गे शिर्डीला अपहरणकर्ते पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने शिर्डी बसस्थानक परिसरातून विवाहिता आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले. पतीचे अन्य साथीदार मात्र वाहनासह फरारी झाले. पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. सिन्नर न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.