खेमचंद कुमावत, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार काल एका बैठकीनिमित्ताने एकत्र आले होते. त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटीलही होते. जयंत पाटील आणि अजितदादा यांच्यात बंददरवाजाआड अर्धा तास चर्चाही झाली. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मीडियाने याबाबत विचारले असता भुजबळ यांनी थेट प्रतिक्रिया दिली. जळगावात चांगले ज्योतिषी आहेत. त्यांनाच या संदर्भात विचारतो, असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
छगन भुजबळ हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार का या संदर्भात मी आता जळगावमधील ज्योतिषांना विचारतो. जळगावमध्ये चांगले ज्योतिषी आहेत. असं होईल का? असं त्यांना विचारतो, असं सांगतानाच हे दोन्ही नेते एकत्र येतील की नाही मला माहीत नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. आमचा पक्ष एक नंबर होत असेल ततर निश्चितच चांगलं आहे. भाजपचे आमदार सव्वाशे पेक्षा जास्त झाले आहेत. ते अधिक वाढतच आहेत. त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचे याचा विचार करूनच काम केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या बंददाराआडील चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील आणि माझीही अनेकदा चर्चा होते. विधानसभेत ते माझ्या बाजूलाच बसतात. आम्ही चर्चा कतो. आव्हाडही माझ्या बाजूलाच असतात. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. अजितदादा आणि जयंत पाटील यांनी चर्चा केली तर काय बिघडले? आम्ही शत्रू नाहीत आम्हाला धडा मिळालेला आहे. ते आमच्या विरोधी पक्षात आहेत. त्यांची मते वेगळी आहेत, आमची वेगळी आहे, असं भुजबळ यांनी सांगितलं.
ओबीसी नेत्यांना डावललं जात आहे का? असा सवाल भुजबळ यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. जे मोठे नेते असतात, त्यांना आजच नाहीतर अगोदरपासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सामाजिक, राजकीय काम करणाऱ्या नेत्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. हे माझ्यासाठी नवीन नाही. मंत्री म्हणून तुम्हाला डावललं गेलं, मात्र याच्याशी त्याचा काही संबंध नाही. तो विषय सोडा, असंही ते म्हणाले.
कांदा निर्यात शुल्कावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला खूप आनंद आहे. मी स्वतः पंतप्रधानांच्या कानावर टाकलं आहे. राज्यपालांच्या भाषणावर बोलताना मी या विषयावर पाच ते सहा मिनिट बोललो होतो. कांद्याचे भाव सुरळीत ठेवण्यासाठी काय केले पाहिजे हे मी त्यांना इथे बसून नाहीतर दिल्लीतून करून द्या असे सांगितले. त्यामुळे मी आनंदी आहे की, पंतप्रधान मोदी यांनी आमची विनंती ऐकली आणि कांदा पिकावरील निर्यात शुल्क कमी केलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नाशिकच्या कुंभमेळा बैठकीला भुजबळ यांना आमंत्रण नव्हतं. त्यावरही ते बोलले. बैठकीबद्दल मला काही माहीत नाही मी थोड्या वेळा पूर्वी एकले. आज ते नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेणार आहेत. मला जर बोलावलं असतं तर सगळ्या आमदारांना बोलवावं लागलं असतं. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी पाहणी करायची असेल, अधिकाऱ्यांनी काय काम केलं या संदर्भात माहिती घ्यायची असेल, त्यानुसार ते सर्वांचा आढावा घेतील आणि भविष्यात कोणत्या मार्गाने जायचं ते ठरवतील. त्यानंतर ते सर्व लोकप्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावतील. मंत्री गिरीश महाजन देखील या बैठकीला उपस्थित आहेत ही चांगली गोष्ट आहे. नाशिकसाठी कोणी चांगला निर्णय घेतला तर आम्हाला निश्चितच आनंद आहे. मला ते बोलवतील नंतर. मात्र जे बोलायचं ते मी अधिवेशनातच बोललो आहे, असंही ते म्हणाले.
महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या मागणीच्या विरोधात मी नाही. महात्मा फुले यांना भारतरत्न द्यायचा असेल तर महात्मा गांधी यांनाही द्या. महात्मा ही पदवी भारतरत्नापेक्षा मोठी आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.