पाकिस्तान सुपर लीग टी२० स्पर्धेचा आगामी हंगाम पुढील महिन्यात सुरू होत आहे. पण त्याआधीच मोठी बातमी समोर येत आहे. या स्पर्धेतील कराची किंग्स संघाने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानी खेळाडू शान मसूदला कर्णधारपदावरून हटवले आहे.
तसेच आता या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे सोपवण्यात आले आहे. याबाबत सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट करत कराची किंग्सने घोषणा केली.
आयपीएल २०२५ लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर आता त्याला काही दिवसांपूर्वी कराची किंग्सने त्याच्या ड्राफ्टमधून करारबद्ध केले. त्याबरोबर त्याला कर्णधारही केले.
डेव्हिड वॉर्नरने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आता तो जगभरातील विविध लीगमध्ये खेळताना दिसत आहे. तो प्रत्येक लीगमध्ये त्याचा प्रभावही पाडत आहे.
त्याने बिग बॅश लीग २०२४-२५ हंगामात सिडमी थंडर्सचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृ्त्वात सिडनी थंडर्स अंतिम सामनाही खेळले, पण अंतिम सामन्यात होबार्ट हरिकेनविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
याशिवाय तो ILT20 2025 स्पर्धेतही दुबई कॅपिटल्सकडून खेळला. दुबई कॅपिटल्सने या स्पर्धेचे विजेतेपदही जिंकले. त्याने हे विजेतेपद जिंकून देण्याच महत्त्वाचा वाटाही उचलला. आता तो कराची किंग्सकडून खेळताना दिसणार आहे.
कराची किंग्सचे मालक सलमान इक्बाल यांनी वॉर्नरचे कौतुक केले आहे. याचबरोबर त्यांनी शान मसूदचेही कौतुक केले आहे.
ते म्हणाले, 'डेव्हिड वॉर्नरचे आम्ही कराची किंग्स कुटुंबात कर्णधार म्हणून स्वागत करतो. त्याचे नेतृत्व आणि कामगिरी आमच्या संघाच्या हेतूशी जुळते. त्याचबरोबर आम्ही शान मसूदचेही कौतुक करतो, त्याने गेल्यावर्षी चांगले नेतृत्व केले. त्याच्या प्रयत्नांमुळे कराची किंग्सचा पाया मजबूत झाला आहे आणि तो संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे, याचा आम्हाला आनंद आहे.'
वॉर्नरकडे याआधी नेतृ्त्वाचा अनुभव आहे. त्याने आयपीएल २०१६ मध्ये त्याच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादला विजेतेपद जिंकून दिले होते. दरम्यान, पाकिस्तान सुपर लीगला ११ एप्रिल २०२५ रोजी सुरुवात होणार आहे. कराची किंग्सला पहिला सामना मुलतान सुल्तान्स विरुद्ध १२ एप्रिल रोजी खेळायचा आहे.