दिग्गज कर्णधार एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सला त्याच्या नेतृत्व कौशल्याने मोठे यश आजपर्यंत मिळवून दिले आहे. त्याच्याच नेतृत्वात चेन्नईने ५ आयपीएल विजेतीपदंही जिंकली. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेच्या आधी धोनीने मोठा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडकडे चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची धूरा सोपवली.
आयपीएल २०२५ साठीही ऋतुराजच्याच नेतृत्वात चेन्नई खेळत आहे. एकूण ऋतुराजच आता चेन्नई संघात कर्णधार म्हणून वारसदार असल्याचे आता दिसून येत आहे.
२०१९ आयपीएल लिलावात चेन्नईने संघात घेतलं होतं. पण पहिल्या वर्षी त्याला खेळायची संधी मिळाली नाही. पण २०२० मध्ये त्याने चेन्नईसाठी पदार्पण करताना स्पर्धेच्या शेवटी प्रभाव पाडला.
२०२१ आयपीएलपासून तर ऋतुराज चेन्नईचा प्रमुख खेळाडू ठरला. तो संघाचा गेल्या चार हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्यानंतर आता गेल्यावर्षी त्याला या संघाचा कर्णधार होण्याचाही मान मिळाला.
दरम्यान, त्याच्या नेतृत्वात गेल्यावर्षी चेन्नईला ५ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांची प्लेऑफची संधी अगदी थोडक्यात हुकली. तथापि, अनेकांनी असंही म्हटलं की ऋतुराज हा फक्त पेपरवर कर्णधार आहे, निर्णय धोनीच घेतो. आता या सर्वच गोष्टींबाबत धोनीनेच मौन सोडले आहे. त्याने जिओस्टारशी बोलताना याबाबत भाष्य केले आहे.
धोनी म्हणाला, 'ऋतुराज आता बरीचवर्षे झाले संघाचा भाग आहे. त्याचा स्वभाव चांगला आहे, तो खूप शांत आहे, संयमी आहे. त्यामुळे ही अशी काही कारणे आहेत, ज्यामुळे आम्ही त्याचा नेतृत्वासाठी विचार केला होता. '
त्याचबरोबर मैदानातील महत्त्वाचे निर्णय ऋतुराजच घेत असल्याचेही धोनीने सांगितले. तो म्हणाला, 'त्याला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मी सांगितलं होतं की मी जर तुला कोणता सल्ला दिला, तर याचा अर्थ असा नाही की तू तो ऐकलाच पाहिजे. मी जितके शक्य असेल, तितके लांब राहणार आहे.'
४३ वर्षीय धोनी पुढे म्हणाला, 'गेल्या हंगामादरम्यानही खूप लोकांना असं वाटलं की मी मागून सर्व निर्णय घेत आहे. पण खरं हे आहे की ९९ टक्के निर्णय ऋतुराजने घेतले होते. गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षण असे महत्त्वाचे निर्णय सर्व त्याचे होते. मी त्याला फक्त मदत करत होतो. त्याने खेळाडूंना खूप चांगल्या प्रकारे हाताळलं.'
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२५ ची सुरुवात ऋतुराजच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयाने केली आहे. या सामन्यात ऋतुराजने आक्रमक अर्धशतकी खेळीही केली.