आयपीएल २०२५ स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकात एका विकेटने पराभूत केले.
दिल्ली कॅपिटल्ससाठी आशुतोष शर्मा विजयाचा हिरो ठरला. त्याने शेवटपर्यंत हार न मानता लढा दिल्याने दिल्लीसाठी अक्षरश: लखनौकडून विजयश्री खेचून आणली.
२१० धावांचा पाठलाग करताना ६५ धावांवरच ५ विकेट्स दिल्लीने गमावल्या असताना ७ व्या क्रमांकावर इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट म्हणून उतरलेल्या आशुतोष शर्मा तोबडतोड फलंदाजी केली.
आशुतोष ३१ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६६ धावा करून नाबाद राहिला.
त्यामुळे आशुतोष दिल्लीसाठी ७ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळताना सर्वोच्च धावांची खेळी करणारा फलंदाज ठरला.
याआधी हा विक्रम अक्षर पटेलच्या नावावर होता. त्याने ७ पेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ५४ धावांची खेळी केली होती.
याशिवाय आयपीएलमध्ये ७ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक झळकावण्याची आशुतोषची ही दुसरी वेळ.
त्यामुळे आयपीएलमध्ये ७ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिकवेळा ५०+ धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आशुतोषने एमएस धोनी आणि आयुष बदोनीची बरोबरी केली.
या यादीत अव्वल क्रमांकावर आंद्रे रसेल आहे, त्याने आयपीएलमध्ये ६ वेळा ७ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतके केली आहेत.
तसेच दुसऱ्या क्रमांकावर पॅट कमिन्स असून त्याने आयपीएलमध्ये ३ वेळा ७ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतके केली आहेत.