मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर बदनामी केल्याबद्दल स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात मुंबई पोलिसांनी रविवारी (ता. २३) मध्यरात्री गुन्हा नोंदवला. कामराच्या वक्तव्याची क्लिप व्हायरल होताच पश्चिम उपनगरातील हॉटेलची तोडफोड करणाऱ्या ४० पैकी ११ शिवसेना कार्यकर्त्यांना सोमवारी अटक केली. त्यांना जामीन मिळाला आहे.
कामरा याने रविवारी नया भारत या शीर्षकाखाली ४५ मिनिटांचे स्टँडअप कॉमेडी सत्र आपल्या यूट्युब चॅनेलवर प्रसारित केले. त्याच्या चॅनेलचे २० लाखांहून अधिक फॉलोअर असून, दुपारी १२ वाजेपर्यंत हा व्हिडिओ १० लाख व्यक्तींनी पाहिला होता. तो व्हिडिओ पाहून शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्याआधारे नोंद गुन्हा पुढील तपासासाठी खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
या व्हिडिओत कामरा एका गाण्याद्वारे नामोल्लेख टाळून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर व्यक्त झाला. शिंदे उपमुख्यमंत्री आहेत याची जाणीव असूनही कामराने त्यांच्या नैतिक आचरणाबाबत निंदाजनक वक्तव्य केले, त्यांची बदनामी केली तसेच शिवसेना व प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांमध्ये द्वेषभावना उत्पन्न केली, अशी तक्रार आमदार पटेल यांनी केली आहे.
कामराचा शोध सुरूकुणाल कामरा पुदुच्चेरी येथे असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाल्याचे समजते. त्याआधारे पोलिसांनी कामराविरोधात नोंद गुन्ह्यांची माहिती तेथील पोलिस यंत्रणेस देत सतर्क केल्याची माहिती मिळते.