Nagpur : हंसापुरीत हिंसाचारात जखमी झालेल्या इरफान अन्सारी यांचा मृत्यू, रुग्णालयात सुरू होते उपचार
esakal March 22, 2025 08:45 PM

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून नागपुरात झालेल्या हिंसाचारात इरफान अन्सारी हे जखमी झाले होते. मेयो मेडिकल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. इरफान अन्सारी हे रेल्वे स्टेशनला जात असताना हिंसाचारात जखमी झाले होते.

नागपूरमध्ये सोमवारी उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेत इरफान अन्सारी हे गंभीर जखमी झाले होते. ते गितांजली टॉकीज चौकातून रेल्वे स्टेशनला निघाले होते. त्याचवेळी अचानक हिंसाचार सुरू झाला. यावेळी संतप्त जमावाने इरफान अन्सारी यांना मारहाण केली होती.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इरफान अन्सारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर गेल्या सहा दिवसांपासून उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती चिंताजनक होती. शनिवारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

सोमवारी महाल भागात एका समुदायातील युवकांनी परिसरातील घरांवर तुफान दगडफेक केली. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी धरपकड मोहीम राबविली त्यात शंभराहून अधिक युवकांना अटक करण्यात आली आहे. नागपूर शहरातील महाल परिसरात भडकलेल्या दंगलीचा सूत्रधार फहीम खान याने युवकांना भडकाविल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सायबर पोलिसांनी त्याची दखल घेत त्याच्यावर ‘कलम-१५२’ नुसार देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.