नात्यातील नातेवाईकाचे निधन झाल्याने त्या मुलीचे आई-वडील वीस मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे ती मुलगी एकटीच घरी होती.
केज : नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी मावशी व काका बाहेरगावी गेल्याची संधी साधत सख्ख्या मावस भावानेच आपल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मावस बहिणीला फूस लावून पळवून नेल्याची नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री अडीच वाजता घडली. या प्रकरणी केज ठाण्यात (Kaij City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका वस्तीवर पीडित तेरा वर्षीय मुलगी ही आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. या कुटुंबाच्या नात्यातील नातेवाईकाचे निधन झाल्याने त्या मुलीचे आई-वडील वीस मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे ती मुलगी एकटीच घरी होती.
त्यावेळी तिचा मावस भाऊ घरी आला आणि मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास तिला चहा प्यायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने आपल्या वाहनात बसवले. मात्र, ते दोघे परत आलेच नाहीत. त्यामुळे त्या मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांचा शोध घेतला असता, ते कुठेही आढळून आले नाहीत. या प्रकरणी अखेर शुक्रवारी मुलीच्या आईने केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड हे करत आहेत.