आईचं प्रेम, तिचा स्पर्श... !
esakal March 23, 2025 11:45 AM

- दिलीप कुंभोजकर, kumbhojkar.dilip@gmail.com

कवी माधव ज्यूलियन म्हणजेच डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन यांची प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधू आई ! ही लोकप्रिय कविता. संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील ही कविता ऐकताना रसिकांचे मन गलबलते.

पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहास कवी डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन यांचे नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला गेला आहे. माधव ज्यूलियन यांचा जन्म बडोदे येथे झाला तर प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील आवळस येथे झाले. पण परत बडोदे येथे मामाकडे जाऊन त्यांनी बी.ए. केले.

नंतर मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयातून फारसी व इंग्रजीत एम.ए. केले. प्रथम फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते पण नंतर अमळनेर, कोल्हापूर येथे फारसीचे प्राध्यापक म्हणून काम केले. वैयक्तिक आणि व्यावहारिक जीवनात त्यांना खूप तडजोड करावी लागली.

‘गॉड्ज गुड मेन’ या मेरी कोरलेली यांच्या कादंबरीतील एका व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्यूलियन हे नाव घेतले असे सांगितले जाते. ते रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होत. त्यांच्या ठिकाणी विद्वत्ता आणि कवित्व यांचा अपूर्व असा मिलाफ झालेला बघायला मिळतो.

जरी ते वृत्तीने झुंजार कवी जाणवले, तरी त्यांच्या साहित्यातून कणखरपणा बरोबर वात्सल्याची कोमल भावना अनुभवास मिळते. त्यांच्या ''गज्जलांजली'' या निर्मितीमधून यौवनातील प्रेम व्यक्त झाले आहे पण त्या वेळेच्या समाजास हे मान्य झाले नाही, त्यांना ‘प्रणयपंढरीचा वारकरी’ ही पदवी देऊन हिणवले.

‘छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाकडून मराठी साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना भारतातली पहिली डी. लिट. प्रदान केली गेली. ते १९३६ मध्ये जळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात अध्यक्ष होते. मराठीत त्यांनी उमर खय्याम यांचा रुबाया तसेच गझल, सुनीत हे काव्यप्रकार समर्थपणे आणले. ‘फारसी - मराठी शब्दकोश’ ही त्यांनी महत्त्वपूर्ण देणगी मराठी सारस्वताला दिली आहे.

प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधू आई !

बोलावु तूज आता, मी कोणत्या उपायी ?

ही कविता म्हणजे एक पोरका मुलगा जो आईच्या प्रेमाला लहानपणीच पारखा झाला आहे, त्याचे मनोगत आहे. त्याच्या मनोव्यापाराचे विश्लेषण आहे, त्याच्या भावनांचा हृदयस्पर्शी आविष्कार आहे. आजही आईच्या प्रेमाला लहानपणीच मुकले आहेत त्यांना ही कविता आणि लतादीदींचा स्वर गलबलून सोडतो. प्रेम ही भावना ही दोन जीवांना अंतःकरणापासून जोडणारा अदृश्य धागा आहे किंवा आत्ताच्या भाषेत Cordless Bluetooth आहे.

त्यातही आई आणि मुलगा / मुलगी यांचे प्रेम म्हणजे अत्युच्च आणि निरपेक्ष असा ऋणानुबंध आहे. कधी कधी वास्तव इतके भयानक असते की मन स्वीकारत नाही. आई आता परत येणार नाही हे माहीत आहे. तरीही मनात आठवणींच्या पलीकडील डोंब पेटल्यावर तो वात्सल्य सिंधूला म्हणजेच प्रेमाच्या सागराला विचारत आहे -

बोलावु तूज आता, मी कोणत्या उपायी ?

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,

तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना कांहीच रूपरेखा,

आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका॥१॥

आईविना वाढलेला, समजूतदार पोरका पोरगा प्रामाणिकपणे कबूल करीत आहे की माझी आबाळ झाली नाही, माझ्याकडे कोणी दुर्लक्ष केले नाही. तरीसुद्धा... "आई तुझी उणीव माझ्या अंतःकरणात कायम आहे. तुझा चेहरामोहरा मला आठवत नाही पण माझा जीव हे ऐकत नाही, माझ्या मनाला तुझा स्पर्श हवा आहे." ही वेदनेची संवेदना आहे. ''ज्याचे जळते त्याला कळते,'' या उक्तीनुसार कवी येथे व्यक्त होत आहे.

ही भूक पोरक्याची होई न शांत आई

पाहुनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांहीं

वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे

नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे॥२॥

वात्सल्य म्हटले की गाय आणि वासरू आपल्या डोळ्यासमोर नकळत येतात. वात्सल्य हा एक निरपेक्ष प्रेमाचा आदर्श आहे. मुल रडले की आई त्याला पदराखाली घेते. तिच्या दोन हातांचा स्पर्शही तिच्या दुधाएवढाच महत्त्वाचा आहे, तिची मांडी हा त्या बालकांचा विश्वास आहे, कवच आहे.

कवी आर्तपणे आईला सांगतो आहे, की माझी शारीरिक भूक ही वरचे दूध भागवेल पण माझी मानसिक भूक हा तुझा स्पर्शच आहे. दुसऱ्यांचे असे प्रेम पाहून मी जास्तच अस्वस्थ होतो, वाटते की आत्ताच्या आत्ता निघावे आणि तू जिथे असशील तेथे येऊन तुझ्या जवळ निजावे, तुला भरभरून पाहावे, आतून हसावे आणि तुझ्या हृदयात, मनात, अंतःकरणात विसावे. कवीची ही हृदयस्पर्शी आळवणी ऐकून आपल्या डोळ्यात पाणी येते.

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके,

देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?

घे जन्म तू फिरुनी, येईन मीहि पोटी,

खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी॥३॥

या कवितेचा अभ्यास करताना मनात सहज विचार आला, की शेक्सपियरच्या हॅम्लेटची प्रत्यक्ष आई कुठे आणि माधव ज्यूलियन यांनी या कवितेत उभी केलेली अप्रत्यक्ष आई कुठे आहे? भावना दोन्हीकडे आहेत पण संस्कृतीच्या संस्काराचा आविष्कार वेगळा आहे. लहान बालकाचा अस्वस्थपणा आईने त्याला छातीपाशी जवळ घेतले की कमी होतो, हृदयाचे वाढलेले ठोके आपोआप मंद होतात.

आई मला माहीत आहे, की तू या जन्मी मला भेटणार नाही तरी तुला भेटण्याची मनातील आस कमी होत नाही. तू परत जन्म घे, मी परत तुझ्याच पोटी जन्म घेतो. ही माझी इच्छा देव नक्की पुरी करेल. आद्य शंकराचार्य यांच्या पंक्तींमधून आपली पुनर्जन्मावरील श्रद्धा म्हणते, "पुनरपि जननं, पुनरपि मरणं पुनरपि जननी, जठरं शयनं"॥ माधव ज्यूलियन या वरील ओळीत हेच सांगताहेत.

तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी;

ताटातुटी जहाली, आता कसे करु मी ?

गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा,

अन् राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना? ॥४॥

विविध उदाहरणांतून कवी माधव ज्यूलियन आपल्या भावना या पोरक्या मुलाच्या द्वारे रसिकांपर्यंत पोचवत आहेत. गायवासरू असू दे नाहीतर मायलेकरू... ताटातूट सहन होत नाही. देवकीने जन्म दिला तरी यशोदेचे प्रेम तितकेच खरे आहे. कान्हा, पान्हा आणि तान्हा यांचे नाते अतूट आहे.

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -

जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;

नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते,

अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते॥५॥

तान्ह्या बाळाला, बालकाला सोडून आई जरी दूर दूर गेली तरी प्रेमाचा पान्हा फुटतोच ना ? ("घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी" संत जनाबाई). सतीच्या निष्ठुर प्रथेवर १८२९ मध्ये बंगालमध्ये प्रथम बंदी आली, तरी संपूर्ण देशातील जनमानसात हा नियम रुजायला बराच काळ गेला. काही परिस्थितीचे बळी गेले, तरी आज सतीप्रथेचे कोणीच समर्थन करणार नाही. आज मथितार्थ एकच घ्यायचा की हा पोरका अनाथ मुलगा आईची उणीव जाणून आक्रोश करीत आहे.

विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,

आईविणे परी मी हा पोरकाच राही.

सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे ,

तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे ॥६॥

आईविना वाढलेला हा मुलगा म्हणत आहे, की जरी आज मी शिकलो आहे, लक्ष्मी प्रसन्न आहे, मानसन्मान मिळाला तरी मी ''पोरका''च आहे. सगळं ऐश्वर्य मिळाले तरी आईचे प्रेम माझ्या नशिबात नाही. ही भावना माझ्या पोटात कायम पेटलेली आहे, ती मध्येच प्रसंगाने माझ्या मनावर अधिकार गाजवते.

आई तुझया वियोगे ब्रह्मांड आठवे गे !

कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे

किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,

अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती ॥७॥

'आई...' लतादीदींचा आर्त स्वर अंतःकरणात घुसतो, तेव्हा कवीचे शब्द त्या आवाजात विरघळून जातात. आई तुझा वियोग, दुरावा, त्याच दु:ख कमी करण्यासाठी मला अख्ख ब्रह्मांड शोधले तरी तू सापडली नाही. आकाशातील सुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणे उल्का रूप धारण करून तू परत ये ! तुझा आत्मा शरीररूपात नसला, तो विदेह असला तरी माझ्या सभोवती आहे. तुझ्या अव्यक्त भावना मला अश्रूरूपात दिसल्या तरी मला आशीर्वादाचे ते तीर्थ जाणवते.

आपल्याकडे एक अशी म्हण आहे, की अशी दु:खद वेळ आपल्या शत्रूवर सुद्धा येऊ नये. ज्यांना आईचे प्रेम आणि सहवास लाभला त्यांना या पोरक्या मुलांची व्यथा कदाचित जाणवणार नाही पण कोणत्याही सहृदयी माणसाला समजल्याशिवाय राहणार नाही. माधव ज्यूलियन आणि त्यांच्या "प्रेमस्वरूप आई"च्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.