आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा वरचष्मा दिसला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 155 धावा केल्या आणि विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पूर्ण केलं. रचिन रविंद्रने षटकार मारून सामना जिंकवला. तर दोन चेंडू खेळून महेंद्रसिंह धोनीच्या खात्यात एकही धाव आली नाही. 8 चेंडूत 4 धावांची गरज असताना महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरला. नमन धीर गोलंदाजी करत होता. महेंद्रसिंह धोनी या षटकाच्या पाचवा आणि सहावा चेंडू खेळून काढला आणि पुढच्या षटकात स्ट्राईकला रचिन आला. त्याने सॅटनरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि विजय मिळवून दिला.
एमएस धोनी जेव्हा फलंदाजीसाठी क्रीजवर आला तेव्हा चेन्नई सुपर किंग्सचा विजय जवळपास निश्चित झाला होता. अशा स्थितीत दीपक चाहरने धोनीला डिवचण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या जवळ जाऊन टाळ्या वाजवून काही तरी पुटपुटत होता. खरं तर मस्करीत हा सर्व प्रकार सुरु होता. विजय मिळवल्यानंतर धोनी आणि रचिन मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना हस्तांदोलन करू लागले. यावेळी दीपक चाहर आणि महेंद्रसिंह धोनी समोर आले. तेव्हा धोनी हातातल्या बॅटने चाहरला फटका मारला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यातून धोनी आणि चाहर यांच्यातील मैत्री अधोरेखित होत आहे. दीपक चाहर हा महेंद्रसिंह धोनीचा शिष्य म्हणून ओळखला जातो. मागच्या पर्वापर्यंत दीपक चाहर चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. पण फ्रेंचायझीने रिलीज केल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याच्यावर डाव लावला आणि संघात घेतलं. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने 9.25 कोटी रुपये मोजले.