आवळा हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास, पचन सुधारण्यास आणि त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच आवळ्याचे अनेक प्रकार आहेत जसे की, कच्चा आवळा, सुका आवळा आणि आवळा पावडरच्या स्वरूपात अशा अनेक प्रकारे आवळा खाल्ला जातो. तथापि आवळ्याचे इतके प्रकार असताना नेमकी कोणत्या आवळ्याचे सेवन करावे याबद्दल लोकं अनेकदा गोंधळलेले असतात.
तुम्हालाही आवळा खाण्याबद्दल आणि तो कोणत्या प्रकारचा खाणे अधिक फायदेशीर ठरेल याबद्दल गोंधळ वाटत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आज आपण जाणून घेऊया की कच्चा आवळा खाणे जास्त फायदेशीर आहे की सुका आवळा. तसेच, त्यांचे फायदे काय आहेत आणि ते कसे खावेत?
कच्चा आवळा नैसर्गिकरित्या सर्वात पौष्टिक असतो कारण त्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. कच्च्या आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच वाढविण्यास देखील मदत करते. मधुमेहासाठीही कच्च्या आवळ्याचे सेवन फायदेशीर आहे. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि शरीरात इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते. कच्चा आवळा त्वचा, केस आणि पचनासाठी उत्कृष्ट आहे. त्याचे सेवन डिटॉक्सिफिकेशनमध्ये देखील मदत करते.
जर तुम्हाला कच्चा आवळा खायला आवडत नसेल तर सुकवलेला आवळा किंवा आवळा पावडर देखील एक उत्तम पर्याय आहे ज्याचे सेवन सहजरित्या करता येते. तसेच सुकवलेला आवळा तुम्ही बराच काळ साठवून ठेऊ शकतात. यात तुम्ही जर सुकवलेल्या आवळ्याचे सेवन केल्यास तुमची पचनसंस्था मजबूत राहते, ज्यामुळे आम्लपित्त, अपचन आणि गॅसची समस्या दूर होते. तसेच, जर तुम्ही सुका आवळा किंवा आवळा पावडर खाल्ल्यास घसा खवखवणे आणि सर्दी यापासून आराम मिळतो. सुकवलेल्या आवळ्यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करते आणि सांधेदुखी कमी करते. आवळा पावडर चयापचय गतिमान करते आणि फॅट बर्न प्रक्रियेला चालना देते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
जर तुम्हाला आवळ्याची खरी चव आणि अधिक पौष्टिकता हवी असेल तर कच्चा आवळा हा सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला आवळा साठवून दीर्घकाळ वापरायचे असेल तर सुका आवळा किंवा आवळा पावडर वापरणे अधिक सोयीचे ठरेल. अशातच तुम्हाला जर सर्दी-खोकला, पचनाच्या समस्या किंवा वजन कमी करण्यासाठी आवळा पावडर अधिक फायदेशीर ठरू शकते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिणे आरोग्यासाठी चांगले असते. यासाठी तुम्ही आवळ्याचे लहान तुकडे करून त्यात थोडे मीठ घालून खाऊ शकता. तसेच सुकवलेल्या आवळा गरम पाण्यात मिक्स करून त्याचा चहा बनवून त्याचे सेवन करू शकता. त्यातच तुम्ही आवळा पावडरमध्ये मध व कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकता, यामुळे पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय, आवळ्याचा मुरब्बा बनवून खाऊ शकता.