Maharashtra Politics : दोन्ही शिवसेना आमनेसामने; नेत्यांमध्ये शाब्दिक वार-उलटवार
esakal March 26, 2025 02:45 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या वादग्रस्त टिपणीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (ठाकरे) आपापसांत भिडले असून, शाब्दिक वार-उलटवार सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने कामराचे समर्थन केले आहे, तर शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

कामराने कार्यक्रम केलेला स्टुडिओ बेकायदा असल्याचे सांगून महापालिकेच्या एच पश्चिम प्रभागाने सोमवारी कारवाई केली आहे.

यावरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनीही कुणाल कामरा प्रकरणावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भ्याड टोळीने स्टुडिओत तोडफोड केली. कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले विडंबनात्मक गाणे खरे होते. अशा गाण्यावर केवळ असुरक्षित भ्याडच प्रतिक्रिया देतात. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून, शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे.’’

शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनीही या हल्ल्याचा निषेध

करून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत गलिच्छ भाषेचा वापर करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर हल्ला का नाही केला, असा सवाल त्यांनी केला. यावर शिवसेनेने (शिंदे गट) उलटवार केला आहे.

शिंदे गटाच्या युवासेनेचे सरचिटणीस अमेय घोले म्हणाले, ‘विनोदी कलाकार असलेल्या कुणाल कामराने केलेली थट्टा अत्यंत निंदनीय आहे. विनोदाच्या नावाखाली समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींवर खालच्या पातळीवर जाऊन केलेली ही टीका दुर्लक्षित करता येणार नाही. अनेक जण त्याचे समर्थन करीत आहेत, हे अत्यंत दु:खद आहे. युवासेना या अश्लील आणि अपमानास्पद वागणुकीचा तीव्र निषेध करते. लवकरच आंदोलनही छेडू.’’ दरम्यान, विनोदाच्या आडून आपला राजकीय अजेंडा पुढे रेटणाऱ्या या टिनपाट ‘न’कलाकाराच्या मागे असणाऱ्या मास्टरमाइंडचा शोध घेऊन त्यांच्यावरदेखील कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार आणि प्रवक्ते राहुल शेवाळे यांनी केली.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा केवळ बोलका बाहुला आहे. त्याचा ‘बोलविता धनी’ वेगळा आहे. ज्या घटनेचा हवाला सध्या तो देतोय, त्याच घटनेने निर्माण केलेल्या निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, संसद भवन, विधान भवन या शीर्षस्थ संस्थांनी स्पष्टपणे निर्णय दिला आहे, अशा विषयाबाबत अपप्रचार करून स्वतःचा राजकीय अजेंडा चालवणे, हा एक प्रकारे घटनेचा अवमान आहे.

- राहुल शेवाळे, माजी खासदार व प्रवक्ते, शिवसेना

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.