- अद्वैत कुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोहन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स
तंत्रज्ञान क्षेत्र म्हटले की, अनेकांना केवळ प्रोग्रॅमिंग किंवा कोडिंगचीच कल्पना येते. मात्र, टेक क्षेत्रात प्रोग्रॅमिंगशिवायही अनेक उत्तम करिअर संधी उपलब्ध आहेत. सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, युएक्स/युआर डिझायनिंग, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये मागणी आहे. सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात, कोडिंगही करायची गरज नाही, म्हणूनच कोडिंग पलीकडे जाऊन आपल्याला करिअरच्या विषयी बघायचे आहे.
सायबर सिक्युरिटी
सायबर सिक्युरिटी हे तंत्रज्ञानातील सर्वांत वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. संगणकीय प्रणालींना आणि डेटाला हॅकिंगपासून सुरक्षित ठेवणे हे या क्षेत्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांना नेटवर्क सुरक्षा, एन्क्रिप्शन, आणि धोका व्यवस्थापन याबाबतचे ज्ञान आवश्यक आहे. सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिस्टिम सिक्युरिटी प्रोफेशनल(CISSP) किंवा सर्टिफाईड एथिकल हॅकर यांसारख्या प्रमाणपत्र कोर्सेसने विद्यार्थ्यांना या क्षेत्रात प्रवेश करता येतो.
डेटा सायन्स
डेटा सायन्समध्ये मोठ्या प्रमाणावर डेटा विश्लेषण करून व्यवसाय निर्णय घेण्यासाठी अंतर्दृष्टी तयार केली जाते. डेटा सायंटिस्टसाठी पायथॉन, आर आणि एसक्यूएल यासारख्या तांत्रिक कौशल्यांसोबतच डेटा व्हिज्युअलायझेशन आणि मशिन लर्निंग यांचे ज्ञान आवश्यक आहे.
क्लाउड कॉम्प्युटिंग
क्लाउड कॉम्प्युटिंग हे आयटी क्षेत्रातील महत्त्वाचे क्षेत्र आहे. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS), मायक्रोसॉफ्ट ॲझ्यूर आणि गुगल क्राऊड यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर कौशल्य विकसित करून क्लाऊड आर्किटेक्ट, क्लाउड इंजिनिअर म्हणून काम करता येते.
यूएक्स/यूआय डिझायनिंग
उत्पादन किंवा सॉफ्टवेअर वापरकर्त्यांसाठी आकर्षक आणि सुलभ बनवण्याचे काम यूएक्स/यूआय डिझायनर करतात. यामध्ये डिझाइन तत्त्वज्ञान, वापरकर्ता संशोधन, आणि प्रोटोटाइपिंग यांसारख्या कौशल्यांची आवश्यकता असते. फिग्मा, ॲडॉब एक्सडी आणि स्केच यांसारख्या टूल्समध्ये प्रावीण्य असावे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग
हे दोन्हीही भविष्यातील तंत्रज्ञानाचे केंद्र आहेत. यामध्ये स्मार्ट सोल्यूशन्स तयार करण्यासाठी डेटा आणि अल्गोरिदमवर काम केले जाते. टेनसॉरफ्लो, पायटॉर्च आणि स्किकिट-लर्न यांसारखी टूल्स शिकून या क्षेत्रात करिअर करता येते.
निष्कर्ष
तंत्रज्ञान क्षेत्र केवळ प्रोग्रॅमिंगपुरते मर्यादित नाही. या क्षेत्रातील विविध शाखा विद्यार्थी आणि व्यावसायिकांना कौशल्य विकसित करण्यास आणि यशस्वी करिअर घडविण्यास अमर्याद संधी देतात. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करा, तंत्रज्ञानाच्या क्रांतीत तुमचे स्थान निर्माण करा आणि करिअरमध्ये क्रांती घडवून आणा!