Responsible Journalism : युट्यूब चॅनेल व नव माध्यमांनी खातरजमा न करता बातमी देऊ नये : वळसे पाटील
esakal March 24, 2025 04:45 AM

मंचर : “दिवसेंदिवस युट्यूब चॅनेल व नव माध्यमांची संख्या वाढत चालली आहे. त्यांनी खातरजमा न करता बातमी देऊ नये.” असे आवाहन माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे जीवन मंगल कार्यालयात रविवारी (ता.२३) आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकारांच्या कार्यशाळेत वळसे पाटील बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन दीप प्रज्व्ल्लाने वळसे पाटील, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे, टी.व्ही.9 मराठी चे संपादक उमेश कुमावत व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे,शरद पाबळे, डी.के. वळसे पाटील, सुनिल लोणकर, संतोष वळसे पाटील, निलेश कान्नव, कुमार होनराव यांच्यासह आंबेगाव खेड जुन्नर व शिरूर तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, “सत्यता न पडताळता माहिती प्रसारित केल्यास समाजातील वातावरण बिघडते. मी गृहमंत्री असताना मस्जीदीला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. मालेगाव व अन्य भागात दंगली झाल्या. पोलीस यंत्रणेने केलेल्या तपासात सदर व्हिडीओ बांग्लादेशातील असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रसार माध्यमांनी तसेच प्रत्येकाने आलेल्या कोणत्याही माहितीची किंवा व्हिडीओची सत्यता पडताळणे गरजेचे आहे.”

“पत्रकारांनी कोणत्याही एका विचारला प्राधान्य न देता तटस्थ पत्रकारिता केली तरच पत्रकारितेला भविष्य आहे. अन्यथा पत्रकारितेला अनेक पर्याय उपलब्ध होतील. पत्रकारांनी बदलत्या काळानुसार नव तंत्रज्ञान आत्मसात करावे.” अशी अपेक्षा खरे यांनी व्यक्त केली.

देशमुख म्हणाले, “पत्रकारांची पेन्शन, पत्रकार भवन व पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.”

“पत्रकारांनी काम करताना विश्वासअहर्तता टिकवून काळानुरूप बदलले पाहिजे. ग्रामीण भागातील पत्रकारांनी जोडव्यवसाय करावा.” असे कुमावत यांनी सांगितले.

यावेळी उल्लेखनीय क्षेत्रात काम केलेले प्रदीप देसाई, प्रशांत कडूसकर, उदय ढगे, भरत भोर, संदीप एरंडे, निलेश थोरात, दत्ता गांजाळे, पांडुरंग निघोट, अजय घुले , रत्ना गाडे ,संजय थोरात या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

पूजा थिगळे यांनी सूत्रसंचालन केले.

“कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हे तंत्रज्ञान कृषी क्षेत्राप्रमाणे पत्रकारितेतही क्रांती करणार आहे. या तंत्राचा वापर करून उसाचे एकरी उत्पादन ५० टना ऐवजी १४५ टन उत्पादन निघते. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. पत्रकारिता क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापर करून कार्यक्षमता वाढविण्याच्या संधी आहेत.

दिलीप वळसे पाटील

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.