इंडियन प्रीमियर लीगमधील एल क्लासिको ज्या सामन्याला म्हटले जाते, तो सामना म्हणजे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स. या दोन तगड्या संघात यंदा १८ व्या हंगामात दुसऱ्याच दिवशी सामना रंगला आहे.
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात रविवारी (२३ मार्च) आयपीएल २०२५ मधील तिसरा सामना खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे हा सामना होत आहे.
या सामन्यात कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयाला खलील अहमदने योग्य न्याय दिला. त्याने डावाच्या चौथ्याच चेंडूवर रोहित शर्माला माघारी धाडले. रोहितचा झेल शिवम दुबेने पकडला. रोहितला एकही धाव करता आली नाही.
त्यामुळे आयपीएलमध्ये शू्न्यावर बाद होण्याची ही १८ वी वेळ ठरली. यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने पहिल्या क्रमांकावरील ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांची बरोबरी केली आहे.
मॅक्सवेल आणि कार्तिक हे दोघेही आयपीएलमध्ये प्रत्येकी १८ वेळा शुन्यावर बाद झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पीयूष चावला आणि सुनील नरेन आहे. हे दोघेही प्रत्येकी १६ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
दरम्यान, रोहित बाद झाल्यानंतर सलामीवीर रायन रिकल्टनने आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही खलील अहमदने तिसऱ्या षटकात अप्रतिम चेंडू टाकून १३ धावांवर त्रिफळाचीत केले. पाठोपाठ ५ व्या षटकात विल जॅक्सनला आर अश्विनने शिवम दुबेच्या हातून झेलबाद केले.
यामुळे मुंबईची अवस्था ३ बाद ३६ धावा अशी झाली होती. पण नंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरला आणि संघाला ९ षटकांपर्यंत ७० धावांचा टप्पा पार करून दिला.