जीवनशैलीसंबंधी आजार : कारणे आणि प्रतिबंध
esakal March 25, 2025 09:45 AM

डॉ. ऋतुपर्ण शिंदे - हृदयरोगतज्ज्ञ

आजच्या युगात जीवनशैलीसंबंधी आजार ही एक मोठी आरोग्य समस्या बनली आहे, हे आपण गेल्या आठवड्यात पाहिले. आता जीवनशैलीबाबतच्या काही प्रमुख  आजारांचा विचार करू.

  • हृदयविकार : हृदयविकाराचा झटका (Heart Attack), स्ट्रोक (Stroke) आणि उच्च रक्तदाब (Hypertension) यांचा समावेश होतो. मुख्य कारणे : असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, तणाव आणि जास्त प्रमाणात मद्यपान.

  • मधुमेह : शरीरात इन्सुलिनचा प्रतिकार निर्माण होतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. मुख्य कारणे : जास्त साखरयुक्त पदार्थांचे सेवन, स्थूलत्व आणि शारीरिक निष्क्रियता.

  • स्थूलत्व : जास्त प्रमाणात कॅलरी सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे शरीराचे वजन अनियंत्रित वाढते. यामुळे मधुमेह, हृदयरोग आणि सांधेदुखी होण्याचा धोका वाढतो.

  • उच्च रक्तदाब : याला ‘सायलेंट किलर’ म्हणतात कारण सुरुवातीला त्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मुख्य कारणे : मीठ जास्त सेवन करणे, मानसिक तणाव, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव.

  • कर्करोग : फुफ्फुसाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, जठराचा कर्करोग हे मुख्यतः जीवनशैलीशी संबंधित असतात. मुख्य कारणे : धूम्रपान, मद्यपान, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव.

  • श्वसनविकार : दमा (Asthma), क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) यांसारखे आजार श्वसन प्रणालीवर परिणाम करतात. मुख्य कारणे : वायू प्रदूषण, धूम्रपान, औद्योगिक धूळ आणि रसायने.

आजारांची कारणे
  • असंतुलित आहार : जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त पेय यांचे प्रमाण वाढले आहे. योग्य प्रमाणात जीवनसत्त्वे, प्रथिने आणि फायबर न मिळाल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

  • शारीरिक निष्क्रियता : ऑफिसमध्ये दीर्घकाळ बसून राहणे, स्क्रीन टाइम वाढणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणा आणि चयापचय विकार वाढतात.

  • मानसिक तणाव आणि तणावग्रस्त जीवनशैली : सततचा मानसिक तणाव, चिंता आणि नैराश्य यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो. उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

  • धूम्रपान आणि मद्यपान : फुफ्फुसाचे आजार, कर्करोग आणि यकृतविकार होण्याचे प्रमाण वाढते. मद्यपानामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

  • पर्यावरण प्रदूषण : वाढती हवा आणि पाणी प्रदूषणामुळे श्वसनविकार, त्वचाविकार आणि कर्करोग वाढतो.

आजारांचे परिणाम
  • मृत्युदर वाढणे : या आजारांमुळे जगभरात दरवर्षी कोट्यवधी लोकांचा मृत्यू होतो.

  • आर्थिक भार वाढणे : दीर्घकालीन उपचार आणि औषधांवरील खर्च वाढतो. वैद्यकीय सेवा अधिक महाग आणि दुर्लभ होतात.

  • उत्पादकता कमी होणे : रुग्णांची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो.

  • आरोग्य यंत्रणेवर ताण : रुग्णालये आणि वैद्यकीय सेवा अधिकाधिक गर्दीने भरतात, ज्यामुळे इतर आजारांवर उपचार करणे कठीण होते.

  • प्रतिबंध  आणि व्यवस्थापन

  • आरोग्यदायी आहार स्वीकारणे : हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्य आणि ताजे फळे खाण्यावर भर द्यावा. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर आणि चरबी यांचे प्रमाण कमी करावे.

  • नियमित व्यायाम करणे : दररोज किमान ३० मिनिटे चालणे, धावणे, योग किंवा इतर व्यायाम प्रकार करावेत.

  • मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपाय करणे : ध्यानधारणा, योग आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारावी.

  • धूम्रपान आणि मद्यपान टाळणे : व्यसनमुक्ती केंद्रे आणि जनजागृती कार्यक्रम यांचा फायदा घ्यावा.

  • नियमित वैद्यकीय तपासणी करणे : वेळोवेळी रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल तपासून घ्यावे.

  • सरकारी धोरणे आणि जनजागृती : आरोग्यविषयक शिक्षणाचा प्रसार करावा आणि आरोग्यदायी सवयी प्रोत्साहन द्याव्यात.

आधुनिक जीवनशैलीमुळे या आजारांचे प्रमाण वाढत आहे, परंतु योग्य आहार, नियमित व्यायाम, मानसिक आरोग्य सुधारणा आणि धूम्रपान-मद्यपान यांचे नियंत्रण यामुळे हे आजार टाळता येऊ शकतात. सरकार, आरोग्य संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन निरोगी समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुढील लेखांमध्ये आपण जीवनशैली संबंधित आजारांविषयी तपशीलवार माहिती घेऊयात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.