महेंद्र गोखले - फिटनेसविषयक प्रशिक्षक
चांगले आरोग्य आणि फिटनेस यासाठी आपण सर्व जण प्रयत्न करतो, परंतु ते कसे साध्य करायचे हे कधी कधी समजायला कठीण जाते. वजन कमी करण्याच्या आशेने बरेच लोक खूप व्यायाम करण्यासाठी जिममध्ये येतात; परंतु आपल्याला हे माहिती पाहिजे, की जरी आपल्याला फक्त वजन कमी करायचे असले, तरी त्यासाठी आपल्याला काही आहाराचे नियम पाळायलाच हवेत. वजन कमी करण्याच्या प्रवासात आपला व्यायाम आपल्या शरीराच्या पोषणासाठी मदत करतो. केवळ व्यायाम केल्याने आपल्याला आपले वजन कमी करता येत नाही.
आपल्याला फक्त आपले वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला व्यायामाची नाही, तर योग्य आहाराची आणि लंघन करण्याची गरज आहे. परंतु आपल्याला एक निरोगी, तंदुरुस्त, मजबूत, सुडौल राहायचे असेल आणि शारीरिक क्षमता वाढवायची असेल, तर व्यायामाला पर्याय नाही. म्हणून आपली उत्तम आरोग्याची व्याख्या काय आहे, याचा परत एकदा विचार करा. त्यानुसार आपल्यामध्ये आवश्यक ते बदल करा.
बऱ्याच लोकांना हे कळत नाही, की निरोगी जीवनशैली राखण्यासाठी पोषण (६० टक्के) आणि व्यायाम (४० टक्के) हे दोन सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. या लेखात, आपण पोषण आणि व्यायाम यांच्यातील संबंध आणि आपले शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी ते कसे एकत्रितपणे कार्य करतात याचा शोध घेऊ.
योग्य पोषणाचे फायदेतुमची फिटनेस ध्येये साध्य करण्यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे. योग्य आहारामुळेच आपल्याला उच्च कार्यक्षमता प्राप्त होण्यास, स्नायू तयार होण्यास आणि व्यायामातून रिकव्हर होण्यास मदत होते. कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फॅट संतुलित प्रमाणात घेतल्यास आपल्याला व्यायाम करण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा मिळते. म्हणजे संतुलित आहार हे आपल्या व्यायामासाठी लागणारे इंधन आहे. योग्य आहारामुळे स्नायूबांधणीची क्षमता वाढण्यास आणि दुखापती टाळण्यास मदत होऊ शकते. थोडक्यात, योग्य पोषण आणि व्यायाम एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हणता येईल.
निरोगी जीवनशैलीचा विचारकरताना व्यायाम आणि पोषण या दोन्हीचा विचार एकत्रितच व्हायला हवा. नियमित शारीरिक हालचाली किंवा व्यायाम निरोगी जीवनशैली टिकवून ठेवण्यास मदत करतात, आजारांना दूर ठेवतात आणि शरीरातील ऊर्जापातळी राखतात. व्यायाम आणि पोषणाचा एकत्रित (synergistic) प्रभाव आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य देऊ शकतो. व्यायामामुळे अन्नातील पोषकद्रव्ये शोषून घेण्यास आणि त्याचा उपयोग करण्यास मदत होते, तर योग्य पोषण आपल्या शरीराला नियमित हालचाली आणि व्यायाम करण्यासाठी इंधनाचे काम करते. दोन्हीमध्ये संतुलन साधले, तर आपण एक क्रियाशील आणि निरोगी जीवनशैली जगू शकतो.
पोषण, व्यायामाचे संतुलननिरोगी जीवनशैली राखण्यासाठी पोषण आणि व्यायामाचे संतुलन आवश्यक आहे. पोषण आणि व्यायामामधील संबंधाकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते; परंतु दीर्घकालीन निरोगी जीवनशैली आत्मसात करण्यासाठी हे संतुलन महत्त्वाचे आहे. संतुलित आहार व्यायामासाठी आवश्यक ऊर्जा देतो आणि स्नायूंचे वजन आणि ताकद राखण्यास मदत करतो. पौष्टिक आहारामुळे दुखापतीचा धोका कमी होण्यास आणि व्यायामानंतर रिकव्हरी होण्यास मदत होते. दुसरीकडे, व्यायामामुळे स्नायू, हाडे आणि सांधे निरोगी आणि बळकट होतात आणि दीर्घकाळ फिटनेस राहतो. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी पोषण आणि व्यायामामधील संबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे.
व्यायामापूर्वी आणि नंतरव्यायाम हा निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु व्यायाम हा एकमेव घटक नाही जो हे साध्य करतो हे आपण पाहिले.
व्यायामापूर्वी योग्य पदार्थ खाणे आपल्या शरीरास इंधन देते आणि अपेक्षित हालचाली करण्यास मदत करते. व्यायामानंतर खाल्ल्याने रिकव्हरी आणि शरीर पूर्ववत होण्यास मदत होते, तसेच आपल्याला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली उर्जा मिळते.
व्यायामाच्या आधी आणि नंतर खाण्यासाठी शरीराला योग्य असे पदार्थ घेतले, तर व्यायामातून आणि आहारातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळवता येतो आणि फिटनेस साध्य करता येतो.
सप्लिमेंट्सची भूमिकातंदुरुस्तीसाठी आणि शरीराच्या देखभालीसाठी व्यायाम आणि पोषण आवश्यक असले तरी काही वेळा आपल्या शरीराच्या गरजा केवळ आहाराने पूर्ण होत नाहीत. अशा वेळेला पोषक सप्लिमेंट्सची गरज पडू शकते. अशी सप्लिमेंटस् शरीराची पोषणाची गरज भागवतात, परंतु अशा सप्लिमेंट्सचा वापर करायलाच हवा असे अजिबात नाही.
असे सप्लिमेंट्स आपल्या शरीराच्या पोषणाची गरज आणि आपण घेत असलेला आहार यातील कमतरता दूर करतात. ते आपल्या वर्कआउट्ससाठी, आपली रिकव्हरी आणि व्यायाम उत्तम व्हावा यासाठी मदत करतात. व्हिटॅमिन आणि प्रोटिनशिवायही शरीराला आवश्यक ते सप्लिमेंट्स घेणे ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.