आशा नेगी - लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
‘ब्यूटी ऑफ लाइफ - द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवल’ पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येक वाचकाची एकच भावना असते -आयुष्यात काही मिळो ना मिळो, पण योगिता शहाणेसारखी मैत्रीण मिळायला हवी. ती केवळ एक मैत्रीण नाही, तर संकटाच्या काळात एक आधारस्तंभ, एक विश्वास, एक न संपणारा हक्काचा हात होती. कॅन्सरने माझ्या शरीराला आव्हान दिलं; पण योगिताच्या निःस्वार्थ प्रेमानं आणि सोबतीने कॅन्सरला आम्ही पराजित केलं. जीवनाच्या प्रत्येक वळणावर, दु:खाच्या प्रत्येक सावलीत, ती सोबत उभी राहिली, उजेड बनून, प्रेरणा बनून!
मैत्री म्हणजे काय, याचा खरा अर्थ मला आठवीपासून मैत्रीण असलेल्या योगितामुळे उमगला. माझ्या कर्करोगाच्या प्रवासात अगदी सुरुवातीपासून ती माझ्याबरोबर होती. सोनोग्राफीचा रिपोर्ट योगिताला पाठवला, थोड्या वेळातच तिचा फोन आला. मला ती काळजी करू नको असं म्हणाली, तरी तिच्या आवाजात प्रचंड टेन्शन जाणवत होतं. बायोप्सी केल्यानंतर, रिपोर्ट योगिताला पाठवला. ती मेडिकल फिल्डमध्येच काम करत असल्यामुळे, तिने लगेच तिच्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखवून मला फोन केला. ‘‘आशा, रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. कॅन्सर तुझ्या पूर्ण ब्रेस्टमध्ये पसरला आहे...’’ मी मोबाईल कानाला लावला होता; पण मनामध्ये असंख्य गोष्टी येत होत्या. काहीच कळत नव्हतं; पण एक गोष्ट स्पष्ट होती - तिच्या आवाजातलं प्रचंड टेन्शन.... त्यातला सिरियसपणा कळला. ती खूप टेन्शनमध्ये होती.
तिला मी म्हणलं, ‘‘काळजी करू नकोस, दोन-तीन डॉक्टरांना कन्सल्ट केल्याशिवाय मी कोणताच निर्णय घेणार नाही,’’ आणि फोन ठेवला. थोड्या वेळात व्हॉट्सअप ओपन केला, तर त्यात योगिताचा मेसेज होता : ‘ASHA, I Love You..’ बऱ्याच वेळा काही भावना आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण त्या मेसेजमधून तिनं तिच्या सगळ्या भावना व्यक्त केल्या होत्या. माझ्यावर असणारं प्रेम, तिची काळजी, या सर्वांचा एक गहिरा स्पर्श होता.
या काळात मला कळलं, की नाती केवळ जवळ राहून जपायची नसतात, तर ती मनाच्या जवळ असली तरीही ती तितकीच मजबूत राहतात. योगिताचं प्रेम आणि काळजी माझ्यासाठी एका नव्या उमेदीचं प्रतीक ठरलं.
सर्जरी करायचं ठरवलं, तेव्हा योगितानं मला सांगितलं, ‘‘तू काळजी करू नकोस, मुलांना मी सांभाळीन.’’ केवढा मोठा आधार... किती हे प्रेम. अशा गोष्टींच लढायला तुम्हाला पाठबळ देतात. माझ्या ट्रीटमेंटच्या कठीण काळात, रोजच्या दिवसांमध्ये अनेक अडचणी आल्या; पण योगिताचं प्रेम एक मानसिक आधार ठरला. याच कालावधीमध्ये माझी कूक आणि क्लिनिंगचा स्टाफ गावाला गेले, माझं २५ टाक्यांच्या ऑपरेशन, डॉक्टरांच्या चुकीमुळे माझ्या हाताची हालचाल बंद, अशा स्थितीत, ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवसापासूनच मला स्वतः स्वयंपाक करावा लागला; पण योगिताची काळजी माझ्यासाठी एक नवीन उर्जा घेऊन यायची.
ती नेहमी म्हणायची, ‘‘मी जवळ राहत असते, तर तुला रोज डबा दिला असता. आशा, कसं मॅनेज करणार तू एकटी सगळं?’’ तिच्या या साध्या शब्दांमध्येही किती मोठी आपुलकी होती. तिच्या प्रत्येक फोन कॉलमधून मला एक नवीन अनुभूती मिळत होती. आणि म्हणूनच, मी म्हणते, आयुष्यात काही मिळो ना मिळो; पण योगिता शहाणेसारखी मैत्रीण प्रत्येकाला मिळायलाच हवी. I love you toooo योगिता..