प्रसिद्ध अभिनेते आणि कराटे मास्टर शिहान हुसैनी (Shihan Hussaini ) यांचे दुःखद निधन झाले आहे. ते एक उत्तम तिरंदाजी तज्ज्ञ देखील होते. मंगळवारी (25 मार्च) ला शिहान हुसैनी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शिहान हुसैनी हे बऱ्याच काळापासून कर्करोगाशी लढा देत होते. वयाच्या 60व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कुटुंबियांनी फेसबुकच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे.
हुसैनी यांच्या निधनने शोककळा पसरली आहे. शिहान हुसैनी यांचे पार्थिव हायकमांड येथे त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर मदुराई येथे अंत्यसंस्कार केले जातील. फेसबुक पोस्टमध्ये असे लिहिण्यात आले की, "आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की शिहान हुसैनी आम्हाला सोडून गेले आहेत. त्यांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत हायकमांड बेझंट नगर येथील त्यांच्या घरी असेल."
शिहान हुसैनी खूप काळ आपला लढा चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत होते. त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स देत होते. तामिळनाडू सरकारकडून त्यांना मदत देखील मिळाली होती. तामिळनाडू सरकारने त्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी 5 लाख रुपयांची आर्थिक केली. मीडिया रिपोर्टनुसार, शिहान हुसैनी यांनी मृत्यूच्या काही दिवसाआधी देहदान करण्याचा निर्णय जाहीर केला.
शिहान हुसैनी यांच्या कुटुंबात त्यांची बायको आणि मुलगी आहे. शिहान हुसैनी हे उत्तम अभिनेते सुद्धा होते. त्यांनी 'पुन्नागाई मन्नन' चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांनी चित्रपटात कराटे प्रशिक्षकाची भूमिका केली होती. त्यांनी वेलईकरन, ब्लडस्टोन, बद्री, चेन्नई सिटी गँगस्टर्स या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी रिॲलिटी शोमध्ये प्रशिक्षक म्हणून देखील काम केले आहे. शिहान हुसैनी यांना विविध कला माहित होत्या.