नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : कोपरीगाव सेक्टर २६ मध्ये राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ९ मार्चपासून राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. या मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल करून बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेलार यांनी दिली.
या घटनेतील अपहृत मुलगी कोपरीगाव येथे कुटुंबासह रहाण्यास असून ९ मार्चला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती रात्री उशीरापर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिची शोधाशोध केली; मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेतील अपहृत मुलीचा वर्ण गोरा असून चेहरा गोल; तर नाक सरळ आहे. तीची उंची अंदाजे पाच फूट असून तिने अंगात हिरव्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातला असून त्यावर पांढऱ्या रंगाची ओढणी आहे. या वर्णनाची मुलगी कुणाला आढळून आल्यास तिची माहिती तत्काळ एपीएमसी पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.