इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील सहावा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जात आहे. राजस्थान रॉयल्सचे घरचे मैदान बारसपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे हा सामना होत आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर १५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राजस्थान रॉयल्स प्रथम फलंदाजीसाठी उतरले. राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी चांगली सुरुवात केली होती. पहिल्या ४ षटकात त्यांनी संघाला ३० धावांचा टप्पा पार करून दिला होता.
पण चौथ्या षटकात वैभव अरोराने १३ धावांवरच त्रिफळाचीत केले. त्यानंतर रियान परागने जैस्वालची साथ देण्याचा प्रयत्न केला. त्याने ३ चांगले षटकारही खेचले. पण त्याचा अडथळा ८ व्या षटकात वरुण चक्रवर्तीने दूर केला. त्याने १५ चेंडूत २५ धावा करत यष्टीरक्षक क्विंटन डी कॉककडे झेल दिला.
पाठोपाठ पुढच्या षटकात यशस्वी जैस्वालला मोईन अलीने फसवलं, त्याचा २९ धावांवर हर्षित राणाने झेल घेतला.
नितीश राणा (८) आणि वनिंदू हसरंगाही (४) नंतर झटपाट माघारी परतले. शुभम दुबेही (९) फार काही करू शकला नाही. तरी ध्रुव जुरेल डाव सांभाळत होता. त्याने संघाला १३० धावा पार करून दिला होता.
पण त्यालाही १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हर्षित राणाने त्रिफळाचीत केले. याच षटकात शेवटच्या चेंडूवर शिमरॉन हेडमायरही अंगक्रिश रघुंवंशीकडे झेल देत बाद झाला. ध्रुव जुरेलने २८ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. हेटमायर ७ धावांवर बाद झाला.
तरी जोफ्रा आर्चरने शेवटी आक्रमक दोन षटकार मारले. त्यामुळे संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहचला आले. आर्चर शेवटच्या षटकात स्पेन्सर जॉन्सनविरुद्ध खेळताना १६ धावांवर बाद झाला. राजस्थान २० षटकात ९ बाद १५१ धावा करू शकले.
कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि मोईन अली यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. स्पेन्सर जॉन्सनने १ विकेट घेतली.