Solapur Theatre: चिंतन :रंगभूमीवर काय घडले; काय घडणार?
esakal March 27, 2025 03:45 AM

अमोल धाबळे, नाट्य स्पर्धा समन्वयक

World Theatre Day 2025: २७ मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिवस 'World Theatre Day' म्हणून साजरा केला जातो. शेवटी दिवसांचं महत्त्व काय तर त्या निमित्ताने त्या क्षेत्रात घडत असलेल्या गोष्टींचे सिंहावलोकन होते. काय घडलेले आहे, काय घडायला पाहिजे, या विषयीचे स्वतःशीच स्वतःशी केलेले चिंतन. काही नवीन रंगमंचीय प्रयोग, काही जुनेच विचार पण फक्त ते रंगमंचावर घडत आहे म्हणून त्यात नावीन्य, तर काही घडून गेलेल्या प्रयोगांबद्दल स्वतःचे चिंतन.....

हौशी रंगभूमी चा विचार केला तर राज्य नाट्य आणि बालनाट्य याशिवाय काही विशेष घडताना दिसत नाही हे चित्र फक्त सोलापुरातले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. बर वेगळा काही केलं तर त्याला प्रेक्षक कुठून आणायचा हा प्रश्न सुद्धा हौशिकलावंतांपुढे आहे कारण एकीकडे स्वतःचे उद्योग,व्यवसाय,नोकरी सांभाळून थोडा फार वेळ स्वतःचा विरंगुळा किंवा एक कला जोपासण्याचा प्रयत्न हौशी कलावंत करत असतो.

कलाकृती उभारण्यातच एवढा वेळ जातो त्यानंतर प्रेक्षक जमवण्याची ताकत त्याच्यात राहत नाही. शिवाय सध्याचे वाढते खर्च लक्षात घेता ते हौशी कलावंतांना अवघड गोष्ट आहे. म्हणून सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धांना अन्यन्य साधारण असे महत्त्व आहे.

ज्यामध्ये सादरीकरण करणाऱ्या संघाला सादरीकरणाची रक्कम मिळते, प्रेक्षक मिळतो आणि अत्यल्प अशा प्रवेश फी मधून संघाला निम्मी रक्कम मिळते. ही स्पर्धा संपूर्ण भारतात फक्त महाराष्ट्र राज्यात सुरू आहे आणि त्याचे ६३ वर्ष पूर्ण झालेले आहे, त्याच बरोबर याच धर्तीवर बालनाट्य स्पर्धा देखील शासनाच्या होतात. मुलांच्या सुप्त गुणांना वाव या स्पर्धांमधून मिळतो.

या बालनाट्य स्पर्धेला २१ वर्ष पूर्ण झालेली आहेत. खूप निरनिराळे विषय आशय या स्पर्धांमधून दिसून येतात. पण जी राज्य नाट्य स्पर्धेची समस्या आहे तीच बाल नाट्य स्पर्धेची आहे लेखकांची कमतरता. पण सोलापूर केंद्राच्या बाबतीत सांगायचे झाले तर राज्य नाट्य स्पर्धेला जवळपास ६०% संहिता नवीन होत्या ही जमेची बाब म्हणावी लागेल. बालनाट्य स्पर्धेच्या बाबतीत मात्र अनेक शिक्षण संस्थांची उदासीनता दिसून येते. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे चांगले व्यासपीठ आहे. त्याचा फायदा जास्तीत जास्त संस्थाने आणि कलाकारांनी करून घेणे आवश्यक आहे.

या वर्षी मात्र राज्य नाट्य स्पर्धा आणि बालनाट्य स्पर्धा या शिवाय देखील चांगले सांस्कृतिक कार्यक्रम सोलापूरकरांना पाहायला मिळाले. प्रिसिजन गप्पांच्या माध्यमातून ‘ठकीशी संवाद’ हा वेगळा नाट्यप्रयोग पहायला मिळाला, गिरीजा ओक आणि सुव्रत जोशी या दोन्ही कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतात. तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संगीत मंदारमाला हे विद्याधर गोखले लिखित आणि पं.राम मराठे फाउंडेशन निर्मित संगीत नाटक पाहायला मिळाले.

राज्य नाट्य स्पर्धेमधून खूप वेगवेगळे प्रयोग पहायला मिळाले, तरीही इतके कष्ट घेऊन बसवलेल्या प्रयोगाचे पुढे काय? सादरीकरण कुठे करायचे? त्याच्या खर्चाची सोय काय? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षक कुठून आणायचा? हा प्रश्न कलाकारांच्या पुढे येतोच. त्यामुळे फक्त एखाद्या प्रयोगानंतर अनेक चांगले नाट्यप्रयोगांचे पुढे काही होतच नाही.

हौशी कलावंतांना नाट्य निर्मिती करताना येणाऱ्या समस्या यावर एक अख्खी पुरवणी होऊ शकेल इतक्या समस्या आहेत. पण या सगळ्या अडचणींवर मात करून नाट्य निर्मिती करणारा हौशी कलाकार तितकाच जिगरबाज. परंतु काही चांगल्या कलाकृतींचे अधिक प्रयोग होण्याची कोणतीही सोय महाराष्ट्रात नाही. खूप पूर्वी रंगवर्धन चळवळ होती, सलग तीन वर्ष काम करून तीही बंद पडली. कलाकारांना वेगवेगळ्या गावांमध्ये रंगमंच उपलब्ध करून देण हा त्यामागचा चांगला उद्देश बंद पडला.

ही चळवळ आज चालू असती तर त्याचा बराचसा उपयोग हौशी कलावंतांना झाला असता.

याच वर्षी सोलापुरात सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित दहा दिवसीय बालनाट्य शिबिर घेण्याचा मान सोलापूरला मिळाला. या शिबिरात एकूण सत्तर कलावंतांनी भाग घेतलेला होता. या शिबिराचा समारोप नुकताच संपन्न झाला. अशा प्रकारची शिबिर वैयक्तिक पातळीवर गेली अनेक वर्षे सातत्याने डॉ. मीरा शेंडगे, अश्विनी तडवळकर, अमोल देशमुख हे घेत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून अनेक कलावंत घडलेले आहेत हे सोलापूरच्या नाट्य संस्कृतीसाठी जमेची बाब. नाट्यकला वृद्धिंगत होण्यासाठी सोलापुरातील तीनही नाट्य परिषदांचे कार्य आणि त्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न देखील नाट्यकला संवर्धनासाठी उपयुक्त आहेत.

वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन जुळे सोलापूर भागामध्ये एखादे नाट्यगृह असावे ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. लहान पण सुसज्ज असे नाट्यगृह या भागात झाल्यास सोलापुरातील सध्या कोलमडलेल्या परिवहन व्यवस्थेमुळे दुरावलेला जुळे सोलापुरातील प्रेक्षकही नाटकाचा आनंद घेऊ शकेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.