सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा विलंबाने झाल्याने निकाल वेळेत (२५ ते ३० दिवसांत) लागतील, अशी कुलगुरूंसह सर्वांनाच आशा होती. मात्र, ४० ते ५० दिवसानंतरही ६६ अभ्यासक्रमांचे निकाल प्रलंबितच आहेत. प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासत नाहीत आणि संबंधित प्राचार्यांना विद्यापीठाने वारंवार पत्रव्यवहार करून, फोन करूनही कार्यवाही होत नसल्याने अद्याप सुमारे १४ हजार उत्तरपत्रिका तपासायच्या शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांनुसार दोन सत्रात ९० दिवसांचे अंतर बंधनकारक आहे. मागील सत्र परीक्षेला १५ एप्रिलपर्यंत ९० दिवस पूर्ण होतात. पण अजूनही ६६ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर व्हायचे आहेत आणि पुढील सत्र परीक्षा २२ एप्रिलपासून सुरू करण्याचे विद्यापीठाने नियोजन केले आहे. नियमित प्राध्यापकांनी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मदतीने वेळेत उत्तरपत्रिका तपासाव्यात म्हणून विद्यापीठाने टास्क फोर्स तयार केले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू, प्र कुलगुरू, परीक्षा नियंत्रक, अधिष्ठाता सगळेजण प्राध्यापकांसह प्राचार्यांच्या संपर्कात असतात.
मागील सत्र परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर करता यावा म्हणून ज्या अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासायच्या शिल्लक आहेत, त्या प्राध्यापकांना, त्या कॉलेजच्या प्राचार्यांना परीक्षा झाल्यापासून जवळपास ६० ते ८० वेळा फोन केले, प्राचार्यांना पत्रव्यवहार केला, तरीपण ६६ अभ्यासक्रमांच्या १४ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी थांबलेलीच आहे, हे विशेष. त्यामुळे लॉ, अभियांत्रिकी, एमबीए, एमएस्सी अशा अभ्यासक्रमांचे निकाल प्रलंबित असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यासंदर्भात काय ठोस भूमिका घेतात, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
दीड महिन्यांत ‘एलएलएम’च्या अवघ्या १५३ उत्तरपत्रिका तपासल्या
‘एलएलएम’ अभ्यासक्रमाच्या दोन्ही वर्षातील विद्यार्थ्यांची दीड महिन्यापूर्वी परीक्षा पार पडली. त्या विद्यार्थ्यांच्या केवळ २५९ उत्तरपत्रिका आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ३० दिवसांत निकाल लावण्याची विद्यापीठाची भूमिका असताना देखील संबंधित महाविद्यालयातील या अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांनी ४५ ते ५० दिवसांत २४९ पैकी केवळ १५३ उत्तरपत्रिकाच तपासल्या आहेत. अजूनही ९६ उत्तरपत्रिका तपासायच्या राहिलेल्या आहेत. याशिवाय एलएलबी व बीएएलएलबीच्या देखील २६४८ उत्तरपत्रिकांची तपासणी राहिलेली आहे.
‘या’ उत्तरपत्रिकांची राहिली तपासणी
एलएलएम
९६
एलएलबी
१,०३२
बीएएलएलबी
१,६१६
अभियांत्रिकी
८,०००
एमबीए
१,१००
एमएस्सी
५००
इतर
७००