विविध रंगांच्या कपड्यांनी भरलेलं माझं कपाट उघडल्यानंतर कितीही घाई असली तरी थोडा वेळ तिथे रेंगाळायला होतंच. नेमके कुठले कपडे घालावेत यावर शिक्कामोर्तब व्हायला थोडा वेळ लागतोच. आजकाल मात्र कपाट उघडलं, की फक्त पांढरा रंग नजरेस येतो. इतर रंगांना मागे टाकून आजकाल तोच पुढे असतो.
कपड्यांचा म्होरक्या असल्यासारखा इतरांना आराम करा असं सांगतो- कारण त्याला माहिती आहे, आता फक्त त्याचीच निवड होणार आहे. उन्हाळा सुरू झाला, की पांढऱ्या रंगावरचं माझं प्रेम उतू चाललेलं असतं. माझी हौस असेल किंवा आणखीन काहीही; पण पांढरा रंग मिरवण्याचं धारिष्ट माझ्याकडे आहे, म्हणून मला तो रंग सतत खुणावतो.
काही दिवसांपूर्वी मी एका एक्झिबिशनला गेले होते. तिथं शॉपिंग करत असताना आपण खरंतर निरनिराळ्या दिसणाऱ्या गोष्टींच्या इतक्या मोहात असतो, की आजूबाजूला काय घडतंय, कोण आहे याचं भानही नसतं. नजरेस केवळ ज्वेलरी, ड्रेस, फॅब्रिक दिसत असतात.
त्या दिवशी मात्र अचानकपणे एका व्यक्तीकडे माझी नजर गेली आणि त्या व्यक्तीला न्याहाळत राहावं असं वाटलं, इतकी ती आकर्षक वाटत होती. क्वचितच एखादं व्यक्तिमत्त्व खूप आकर्षित करतं, त्यातलं हे एक होतं. या बाई विलक्षण देखण्या होत्या; परंतु त्यांची लकब आणि वावर खूप सहज होता. त्या दुकानदाराशी बोलत होत्या, तेव्हा लक्षात आलं, की त्या बंगाली असाव्यात.
उंच, ताठ बांधा, सुंदर डौल आणि पांढऱ्या रंगाच्या केसांची पोनी बांधलेली. यामध्ये सगळ्यात आकर्षक त्यांचे पांढरे केस होते. यावरून त्या किमान पन्नाशीच्या घरातल्या तरी असाव्यात असा अंदाज होता. एकूणच वावर मंत्रमुग्ध करणारा होता. केवळ सौंदर्यामुळे नाही, तर त्यांचं वलय खूप आकर्षक वाटत होतं.
जसं पांढरे केस तुमचा अनुभव सांगतात, तसंच प्रसन्न चित्त तुमच्या चेहऱ्यावर झळकत असतं आणि अनुभवानं आलेली स्थिरता इतरांनाही विसावा देत असते. आपलं व्यक्तिमत्त्व हे आपल्या विचारांनी आणि धारणेनं प्रकट होतं आणि म्हणूनच ते उठावदार दिसतं असा प्रत्यय आला.
एक अभिनेत्री म्हणून अशी छाप पाडणारी पात्रं आजूबाजूला दिसणं बऱ्याचदा गरजेचं आहे असं वाटतं. उठल्या ना कुठल्या भूमिकेतून ती निश्चितपणे तोंड वर काढतात. खरंतर पांढऱ्या रंगाचा जबाबदारीशी खूप संबंध आहे. कारण या पांढऱ्या रंगावर छोटासा डागही उठून दिसतो.
निरागसता, शुद्धता, नवी सुरुवात म्हणजे पांढरा रंग. आपला देश विविधतेनं भरला असला, तरी शांतीचं प्रतीक असलेला पांढरा रंग सगळ्या संस्कृतींना जोडून ठेवतो. वारकरी संप्रदायात विविध समाजाच्या लोकांना जोडतो, एवढं या रंगाचं सामर्थ्य आहे. सुरेख, झोकदार, अभिजातपणाचे दर्शन देणारा हा रंग स्टायलिंगसाठी अतिउत्तम आहे. या रंगातही बऱ्याच शेड्स आहेत.
उदाहरणार्थ, मोत्यासारखा पांढरा, दुधासारखा पांढरा, राजहंसासारखा पांढरा इत्यादी. सगळ्या रंगांबरोबर संयोजन करण्यासाठी अतिशय सोपा असा हा रंग. या उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने वापरू शकता त्या संदर्भात काही मुद्दे.
1) लेअरिंग : पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना विविध टेक्स्चर किंवा शेड्ससह लेअर करा, जेणेकरून एक आकर्षक आणि गतिशील लूक तयार होईल. उदाहरणार्थ, ज्यूट, कॉटन, सिल्क, शिफॉन.
2) ॲक्सेसरीज वापरा : मोनोक्रोम तोडण्यासाठी आणि तुमच्या कपड्यांना उठावदार करण्यासाठी बोल्ड किंवा रंगीबेरंगी ऍक्सेसरीज निवडा.
3) न्यूट्रल रंगांसोबत मिक्स करा : पांढऱ्या रंगास न्यूट्रल रंग जसे की बेज, ग्रे किंवा नेव्ही ब्लू सोबत जोडून एक परिष्कृत आणि संतुलित लूक तयार करा.
4) प्रसंगानुसार निवड करा : पांढऱ्या रंगाची योग्य छटा (उदा. ऑफ-व्हाइट, आयव्हरी) निवडा, जेणेकरून ते त्या प्रसंगाशी आणि वातावरणाशी चांगले जुळेल.
5) मिश्रित टेक्स्चर : लेस बॉटम, डेनिम किंवा सिल्क जॅकेट अशा वेगवेगळ्या कपड्यांचं मिश्रण करून लूकमध्ये आकर्षकता येते.