कोलेस्टेरॉल आणि आरोग्य
esakal March 27, 2025 02:45 PM

- सायली शिंदे, योगतज्ज्ञ

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनियमित आहार, कमी हालचाल, आणि मानसिक तणाव यामुळे शरीरात अनावश्यक चरबी साचते आणि कोलेस्टेरॉल वाढते. काही जणांना शरीरावर चरबीच्या गाठी (Lipomas) देखील होतात. या समस्या टाळण्यासाठी योग्य योगासने, संतुलित आहार आणि शिस्तबद्ध दिनचर्या महत्त्वाची आहे.

कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे

तळलेले, गोड, आणि जास्त प्रक्रिया केलेले अन्न, कमी हालचाल आणि व्यायामाचा अभाव. मानसिक तणाव आणि झोपेची कमतरता, हार्मोनल असंतुलन आणि चयापचयाची मंदगती

प्रभावी योगासने

कपालभाती प्राणायाम : आरामशीर बसून डोळे मिटा. जोरात श्वास सोडत पोट आत ओढा. सलग १०० वेळा हा क्रिया करा. फायदे : पचनसंस्था सुधारते आणि चरबी जलद गतीने वितळते. रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते. लिव्हर आणि पित्ताशयाची कार्यक्षमता सुधारते.

सेतुबंधासन : पाठीवर झोपा, गुडघे वाकवा आणि पाय जमिनीवर ठेवा. हळूहळू नितंब वर उचलून छातीपर्यंत आणा. काही सेकंद स्थितीत राहून सावकाश खाली या. फायदे : पचन सुधारते आणि शरीरातील फॅट कमी होते. रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाचे आरोग्य मजबूत होते.

अर्ध मत्स्येंद्रासन : उजव्या पायावर डावा पाय टाकून उजवीकडे वळा. डावा हात मागे ठेवा आणि उजवा हात गुडघ्यावर ठेवा. वीस-तीस सेकंद राहून परत या. फायदे : लिव्हर आणि पचनसंस्था सुधारते, फॅट बर्निंग वाढते. खराब कोलेस्टेरॉल कमी होतो आणि रक्तशुद्धी होते.

नौकासन (कोर स्ट्रेंथसाठी आणि वजन कमी करण्यासाठी) : जमिनीवर बसून दोन्ही पाय आणि शरीराचा वरचा भाग ४५ अंशांत उचला.

हात पुढे ठेवा आणि बोटांवर संतुलन ठेवा. वीस-तीस सेकंद राहून परत या. फायदे : कोर स्नायू बळकट होते आणि पोटाची चरबी कमी होते. पचन सुधारते आणि जळजळीत फॅट बर्न होते.

मंडूकासन (लिव्हर डिटॉक्स करणारे आसन) : गुडघ्यावर बसा आणि हातांनी नाभीला स्पर्श करत कंबरेत पुढे झुका. १०-१५ सेकंद राहून सावकाश परत या. फायदे : चरबी वितळवून शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतो. लिव्हर आणि पचनसंस्था मजबूत होते.

कोणते पदार्थ खावेत?

फायबरयुक्त पदार्थ : ओट्स, जवस, चिया बिया

हिरव्या भाज्या : पालक, मेथी, कोबी

सुपरफूड्स : आवळा, आले, लसूण, हळद

हेल्दी फॅट्स : बदाम, अक्रोड, ऑलिव्ह तेल

प्रोटीन : मूग, चणा, डाळी, ग्रीन टी

कोणते पदार्थ टाळावेत?

तळलेले पदार्थ, बेकरी आयटम्स, जास्त साखर असलेले पदार्थ, प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूड, जास्त प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ

घरगुती उपाय

लसूण आणि मध : रोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण आणि मध खाल्ल्यास फॅट कमी होतो.

आवळा रस : कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दररोज २० मिलीलिटर आवळा रस प्या.

जवस पावडर : ग्रीन टीमध्ये एक चमचा जवस पावडर टाका, यामुळे फॅट लवकर जळते.

गुलकंद आणि तूप : रोज रात्री १ चमचा गुलकंद आणि तूप घ्या.

दिनचर्या सुधारण्याचे सोपे उपाय

सकाळ : कोमट लिंबूपाणी प्यावे. योगासन आणि प्राणायाम करावे. फायबरयुक्त न्याहारी घ्यावी.

दुपार : लघवी होईपर्यंत पाणी प्या. सेंद्रिय आणि घरगुती आहार घ्या. जेवणात लसूण, हळद आणि आले असावेत.

रात्री : हलके आणि पचायला सोपे जेवण घ्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.