जेव्हा आम्ही पुणे-मुंबई सोडून महाबळेश्वरला राहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मनामध्ये कुठल्याही भ्रामक कल्पना नव्हत्या. आम्हाला माहिती होतं, महाबळेश्वर एक दिवस लोकांसाठी स्वप्नवत बनेल, ‘परिकथा’ बनेल; पण त्यासाठी आम्हाला मेहनतच करायला लागणार आहे.
कारण झोप ही स्वप्नं बघण्यापुरतीच महत्त्वाची असते, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धावण्याला पर्याय नसतो. महाबळेश्वरचा आतापर्यंतचा प्रवास हा सुंदर होता; पण सोप्पा नव्हता.. कुठल्याही गोष्टीची सुरुवात म्हटल्यानंतर अडचणी, अचानक उद्भवलेले विचित्र प्रसंग, या सगळ्यातून तुम्हाला जावंच लागतं, आणि सगळ्या परिस्थितीला हाताळायचं कसं हेही तुम्ही शिकत राहता.
कधी कधी गोष्टींची तीव्रता मोठी असली, तरीसुद्धा गाठीशी जमवलेला अनुभव मनाला फुंकर घालण्याचं काम करतो. निसर्गाच्या - माणसांच्या - तिमाही, सहामाही, वार्षिक परीक्षांना बसावंच लागतं; पण शेतावर लागलेला वणवा मात्र आमच्यासाठी बोर्डाची परीक्षा होती..
मी मुंबईमध्ये, स्वप्नील पुण्यामध्ये आणि शेतावरती लागलेला वणवा... दूर राहून जितकं काही करू शकू ते करून झालं होतं... आता वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता.. ‘अडचणीच्या वेळी एक मिनिटसुद्धा एका युगासारखं भासतं’ ही पुस्तकात वाचलेली वाक्यं किती खरी आहेत याची प्रचिती येत होती...
आणि संतोष अप्पांचा फोन आला. पहिल्यांदा मला वाटलं फोन उचलूच नये. असं वाटलं, की हा क्षण असाच थांबून जावा. पलीकडे काय झालंय हे जाणून घेण्यापेक्षा माहिती नसलेलं बरं असं वाटत होत. अक्षरशः बधीर व्हायला झालं होतं. एखादा फोन उचलायला एवढं धाडस एकवटावं लागेल असं मला त्याआधी कधीच वाटलं नव्हतं.
मी कसाबसा फोन उचलला, ‘‘मॅडम ऐका, आग घरापर्यंत पोहोचली नाहीये.. सगळ्यात खालचा टप्पा मात्र पेटला होता. विहिरीचा पाईप जळाला आहे आणि खालचं सगळं गवत जळालंय. पलीकडून दिसताना आगीच्या ज्वाळा इतक्या प्रचंड दिसत होत्या, की वाटत होतं घरच पेटलं आहे... पण सगळं ओके आहे... आणि पोरांनी वणवाही विझवला आहे.’’
‘आमची क्लासरूम?’ मी विचारलं. स्वप्नील आमच्या शेतावरती ‘इंट्रोडक्शन टू पर्माकल्चर’ची वर्कशॉप घेतो. (पर्माकल्चर म्हणजे पर्मनंट ॲग्रीकल्चर - शाश्वत शेती आणि त्या दिशेनं जाण्याकरता कराव्या लागणाऱ्या गोष्टी.) शेताच्या सगळ्यात खालच्या टप्प्यामध्ये एक शंभर वर्षं जुनं उंबराचं झाड आहे. त्याच्या भोवती आम्ही दगड मातीचा पार बांधलाय.
त्याच्याच पसरलेल्या फांद्यांचा आधार घेऊन त्यावर झड्या टाकल्या आहेत आणि त्याला बांबू आणि निरगुडीच्या फांद्यांचा टेकू दिलाय. जगण्याची मजा कशी असते बघा. ज्या निरगुडीच्या काठ्यांचा आम्ही टेकू किंवा झड्यांना आधार म्हणून वापर केला त्यांनी, त्यांना जमिनीत रोवल्या रोवल्या मुळं पकडली आणि बघता बघता त्या काठ्यांना पालवी फुटली.
आता त्या नुसत्या काठ्या नाही राहिल्या. आता ती ‘झाडं’ आहेत. जगायची आणि रुजण्याची जिद्द जर कोणाकडून शिकावी तर ती झाडांकडून! त्या आमच्या छोट्याशा झोपडीवजा क्लासरूमसमोर निळंभोर आकाश आणि दूरवर पसरलेले डोंगर दिसत राहतात.
शंभर वर्षं जुन्या झाडाखाली, शेणानी सारवलेल्या जमिनीवर बसून सगळेजण आपली - त्या झाडापेक्षा जुनी - पण आता लोप पावत चाललेली शेतीची पद्धत किंवा हरवत चाललेलं जमिनीबरोबरच, निसर्गाबरोबरच कनेक्शन शोधतात, शिकतात, अनुभवतात.
आमची ती क्लासरूम - जिनं लोकांचं कुतूहल पाहिलंय, शंकांना उत्तरं दिली आहेत... लोकांचं हसणं साठवून घेतलंय... त्यांच्या मैत्रीची साक्षीदार राहिली आहे... शिकताना सावली दिली आहे... आणि तिकडून निघताना त्यांच्या पावलांना मातीरूपी औषध लावलंय...
‘तुमची क्लासरूम जशीच्या तशी आहे, आग अगदी बाजूनेच गेलीये... पण क्लासरूमला धक्का नाही लावला. ही माणसं इकडे बसून काहीतरी चांगलं काम करतात, तर आपण मध्ये नको जायला, कडेकडेनं जाऊ असं म्हणाली बहुदा..’ असं म्हणून अप्पा हसले... आणि मला मात्र मोठा हुंदका फुटला...
(क्रमशः)