Maharashtra Breaking News Live Updates : जगातील 15 उष्ण शहरात विदर्भातील चार शहरांचा समावेश
Saam TV March 28, 2025 04:45 PM
विट्यात भाजपाकडून आमदार रोहित पवारांच्या विरोधात आंदोलन,अटकेची करण्यात आली मागणी.

अँकर - सांगलीच्या विटा येथे भाजपाच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.सोलापूर मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ल्याचा प्रकार घडला होता,या हल्ल्याचा मास्टरमाइंड आमदार रोहित पवार असल्याचा आरोप करत खानापूर तालुका भाजपाच्यावतीने आमदार रोहित पवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी रोहित पवारांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला,शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत आमदार रोहित पवारांचा निषेध नोंदवत,आमदार रोहित पवारांना अटक करावी,अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

Maharashtra Breaking News Live Updates : जगातील 15 उष्ण शहरात विदर्भातील चार शहरांचा समावेश

- ब्रम्हपुरी जगातील 8 व्या क्रमांकाचे उष्ण शहर..

- नागपूर अकराव्या तर अकोला, चंद्रपूर चौदाव्या पंधराव्या क्रमांकावर

- एलडोराडो नावाच्या संकेतस्थळावर दररोज जगभरातील सर्वाधिक उष्ण आणि थंड शहरांची यादी प्रकाशित होते

- या यादीनुसार गुरुवारी जगभरातील सर्वाधिक उष्ण शहराच्या यादीत भारतातील पाच शहर होती यातील चार विदर्भातील तर पाचवे शहर प्रयगराज होते.

नवी मुंबईत पाणी पुरवठा राहणार बंद

सिबिडी सेक्टर 28 येथे अमोरबे धरणाच्या मुख्य जल वाहिनीला झालेल्या गळतीमुळे आज नवी मुंबईत पाणी पुरवठा राहणार बंद.

सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा राहणार बंद.

आज संध्याकाळचा पाणी पुरवठा राहणार बंद तर उद्या सकाळी कमी दाबाने होणार पाणी पुरवठा.

धाराशिव जिल्ह्यात 69 शेतकऱ्यांनी केली तुरीची नोंदणी,नोंदणीसाठी 15 दिवसाची मुदतवाढ

नाफेड च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या तुर खरेदी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तुर उत्पादक शेतकऱ्यांना 7 एप्रिल पर्यंत तुरीची नोंदणी करता येणार आहे.तुर नोंदणीला पहील्या टप्प्यात 24 फेब्रुवारीपासुन 30 दिवसापर्यंत मुदत होती 24 मार्च पर्यंत जिल्ह्यातील 69 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असुन केवळ 27 जणांना तुर खरेदीसाठी संदेश पाठवले आहेत. जिल्ह्यात तुर खरेदीसाठी 21 केंद्र मंजुर आहेत माञ त्या तुलनेत तुरीची नोंदणी व झाल्याने एकही क्विंटल तुरीची खरेदी झाली नाही.

जिल्हा मध्यवर्ती बँकेला 685 कोटीचे उद्दिष्ट

शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी गुढीपाडव्यानंतर सुरू होते नांगरणी पासून तर बी बियाण्याची खरेदी यादी कामाची लगबग सुरू होते त्यामुळे वेळेवर पीककर्ज मिळावे याकरिता खरीप हंगामासाठी बँकांना पीक कर्ज वाटप चे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले असून अपेक्षाप्रमाणे यंदाही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेला सर्वाधिक 685 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत तर स्टेट बँकेला 570 कोटी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी निश्चित करून दिले.

बुलढाण्यात उन्हाळी भुईमूग पेरणीचे क्षेत्रफळ वाढले

यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली, सध्या भुईमुगाचे पीक चांगलेच बहरत आहे, मात्र हवामानातील बदल, जमिनीत जास्त ओलावा आणि तापमानातील चढ-उतार यामुळे भुईमुगावर बुरशीजन्य रोगांचा संभाव्य धोका वाढला आहे, त्यामुळे पांढरी बुरशी, मूळकूज आणि खोडकूज होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे..

यावर्षी 5 हजार 957 हेक्टर क्षेत्रफळावर उन्हाळी भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे...

Solapur Live : - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर जाहीर

- 27 एप्रिल रोजी मतदान तर 28 एप्रिल ला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार

- काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने विरुद्ध भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलमध्ये होणार मुख्य लढत

- भाजपाचे विद्यमान आमदार आणि बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांनी निवडणुकीतून घेतली माघार

- दिलीप माने आपला गड राखणार की सचिन कल्याणशेट्टी बाजार समितीवर ताबा मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं

- मागील निवडणुकीत तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख विरुद्ध तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यात लढत झाली होती.

- यंदा मात्र विद्यमान सभापती विजयकुमार देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने मोठी खळबळ उडालीय

- 25 ते 28 मार्च दरम्यान अर्ज विक्री आणि 1 एप्रिल रोजी अर्जाची छानणी तर 2 ते 18 एप्रिल दरम्यान अर्ज माघार. घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे

- काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी सभापती दिलीप माने यांना विधानसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती

- त्यामुळे आता बाजार समितीवर आपली सत्ता प्रस्थापित करणे दिलीप माने यांना राजकीय अस्तित्वासाठी अनिवार्य आहे

- त्यामुळे सुरवातीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीवर दिलीप माने वर्चस्व राखणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Solapur : सोलापुरात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना आले सुगीचे दिवस

सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु असल्याने बेदाण्याला बाजारात आहे मोठ्या प्रमाणात मागणी..

बेदाण्याला 250 ते 400 रुपये प्रतिकिलो दर बाजारात मिळतोय.

सांगली, तासगाव, कलबुर्गी, विजयपूर, बिदर, बसवकल्याण भागातील खरीददार सध्या सोलापुरात येत आहेत.

यंदाच्या वर्षी बेदाण्याचं उत्पादन कमी असल्याने दर सुरुवातीपासून चढेच दिसून येतायत.

त्यामुळे यंदा बेदाणा उत्पादक शेतकरी मालामाला होत असल्याच चित्र दिसून येत आहे.

Nashik News : नाशिकच्या सिन्नरला रुग्णवाहिका संघटनेकडून सहकाऱ्याला अखेरचा सलाम

नाशिकच्या सिन्नर रुग्णवाहीका संघटनेने आपल्या चालक सहकाऱ्याला मृत्यू पश्चात अखेरचा निरोप दिला. गणेश काकड याने 27 मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र गणेश काकड हा सहकार्य आणि सामाजिक कार्य करणारा रुग्णवाहीका चालक म्हणून गेल्या काही वर्षात प्रकाशझोतात होता. त्याच्या मृत्यू पश्चात सिन्नर तालुका रुग्णवाहीका चालक मालक संघटनेने सर्व रुग्णवाहीका दिमतीला घेत अंत्ययात्रेत दिवा लावून मार्च करत आपल्या लाडक्या सहकाऱ्यास अखेरचा सलाम दिला.15 किलोमीटर पर्यंत शव वाहतूक करण्यास मोफत सेवा. गरजू व्यक्तींना वेळ प्रसंगी सवलत, पोलीस असो कि पत्रकार, डॉक्टर असो कि रुग्णसेवक या सर्वांना मदत म्हणून गणेश काकड अग्रेसर असायचा. गेल्या 5 ते 6 दिवसापासून तो तणावात असल्याचे त्याचे सहकारी सांगतात. आज मोठ्या जनसमुदायासह अंत्ययात्रा पार पडली, तेव्हा पोलीस कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी, पत्रकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा परिवाराच्या सांत्वनासाठी समावेश होता.

Nagpur पोलीस कर्मचाऱ्याने दारू पिऊन घातला गोंधळ, गुन्हा दाखल

- वाडी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्याने दारू पिऊन घातला गोंधळ, गुन्हा दाखल

- प्रदीप जोगेश्वर चौधरी असं गुन्हा दाखल झालेल्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच नाव...

- दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. पत्नी तक्रार द्यायला गेली असता, वाडी पोलीस स्टेशन मध्ये जाऊनही गोंधळ घातला

- वाडी पोलिसांत पत्नीच्या तक्रारीवरून प्रदीप चौधरीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूच्या निषेध गोंधळ घालत चक्क पोलीस आयुक्तांना फोन लावतो, पीआयला निलंबितच करतो अशा पद्धतीची भाषा वापरली..

- पोलीस कर्मचाऱ्यांनीच अशा पद्धतीची गैरवर्तणूक केल्यानंतर चर्चेचा विषय ठरला.

-

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लूने डोके वर काढले; कावळे मरण्याचे प्रमाण वाढले

धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने पुन्हा एकदा डोकं वर काढल आहे. जिल्ह्यात कावळे मरण्याचे प्रमाण अचानक वाढल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.काही दिवसांपूर्वी ढोकी परिसरात कावळे मृत अवस्थेत आढळून येत होते.तपासणीनंतर त्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली असल्याचे उघड झालं होतं.आता पुन्हा कळंब शहर, दहिफळ गावासह जिल्ह्यातील इतर परिसरात कावळ्यांचा अचानक मृत्यू होऊ लागला आहे.आतापर्यंत जिल्ह्यात 50 पेक्षा अधिक कावळ्यांची मृत्यू झाला आहे.कावळ्यात स्थलांतर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं,हा आजार त्यातून आला आहे.पक्षी बर्ड फ्लू ने बाधित झाला असेल त्यात कावळे संपर्कात आल्याने कावळे मृत अवस्थेत आढळत असल्याचं पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी सुरू.

मार्च महिन्याअखेरीस दस्त नोंदणीसाठी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी कार्यालये खुली ठेवण्याचा निर्णय नोंदणी आणि मुद्रांक विभागाने घेतला आहे. त्यानुसार शनिवार ते सोमवार (२९ ते ३१ मार्च) कार्यालये सुरू राहील, अशी माहिती सहनोंदणी महानिरीक्षक अशोक पाटील यांनी दिली.

दर वर्षी एक एप्रिल रोजी रेडीरेकनरच्या दरात बदल होतो. त्यामुळे मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर दस्त नोंदणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. यंदा शनिवारी आणि रविवारची सुटी आणि सोमवारी रमजान ईदची सुटी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी तिन्ही दिवशी कार्यालये खुली ठेवण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

Pune Live : साखरेमुळे रेल्वेला ‘गोड’ दिवस..

देशभरात साखर पोहोचविण्यासाठी रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली असून, भरघोस उत्पन्नाच्या माध्यमातून रेल्वेलाही गोड दिवस आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर वाहतुकीमध्ये ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रेल्वे विभागाला प्रवासी वाहतुकीनंतर सर्वाधिक उत्पन्न मालवाहतुकीतून मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने साखर, पेट्रोलियम पदार्थ, ऑटोमोबाइल आणि इतर सामग्रीच्या वाहतुकीचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाला मालवाहतुकीतून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ५०६.८० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. रेल्वेने फेब्रुवारीअखेर ७५ कोटी (३.४ टक्के) अतिरिक्त महसूल प्राप्त करताना, ५२४.१४ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी सर्वाधिक ३०६.४१ कोटी रुपयांचे उत्पन्न केवळ साखरेच्या वाहतुकीतून मिळाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

भिवंडीत खाडीतील प्रदूषित पाण्यावर पालेभाज्यांची शेती ; प्रशासनाचे दुर्लक्ष

भिवंडी शहरालगत वाहणाऱ्या कामवारी नदीचे नदीनाका या ठिकाणी खाडीत रूपांतर होत आहे.परंतु या ठिकाणी नजीकच्या शेलार खोणी या ग्रामीण भागासह शहरातील कपड्यावर रंग प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यातील प्रदूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता खादी पात्रता सोडले जात आहे.या प्रदूषित पाण्यावर पालेभाज्यांची शेती पिकवून ती बाजारात हिरवीगार ताजी भाजी म्हणून विक्री केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. भिवंडी शहरा नजीक असलेल्या खोणी पुलाच्या शेजारी नदीकिनारी पालक मेथी व माठ अशा पाले भाज्यांची शेती केली जाते. भाडेतत्वावर जमीन घेऊन परप्रांतीय शेतकऱ्यां कडून ही शेती केली जात आहे. या शेतीसाठी कामवारी नदीपात्रात प्रक्रिया न करता सोडलेले डाईंग सायजिंगचे सांडपाणी व नाल्यातील घाण पाण्याने ही शेती केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.परंतु याकडे पालिकेचे पर्यावरण विभाग तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे सोयिस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.

अफ्रिकेच्या समुद्र चाच्यांनी अपहरण केलेल्या खलाशांमध्ये रत्नागिरीतील दोन तरुण

आफ्रिकेच्या समुद्रात समुद्री चाच्यांनी एका जहाजावर हल्ला करून अपहरण केलेल्या 10 खलाशांमध्ये रत्नागिरीतील 2 तरुणांचा समावेश आहे..मिरकर समीन जावेद आणि सोलकर रिहान शब्बीर अशी या दोघांची नावं आहेत. आपल्या मुलांना सोडवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी या मुलांच्या कुटुंबियांनी सरकारकडे केली आहे.

मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटाजवळ, सँटो अँटोनियो दो प्रिन्सिपेपासून ४० नॉटिकल मैल आग्नेय दिशेला समुद्री चाच्यांनी या जहाजावर 17 मार्च रोजी हल्ला केला होता. या घटनेत 10 खलाशांचं अपहरण करण्यात आलं असून, त्यापैकी 7 भारतीय आणि 3 रोमानियन आहेत.

यामध्ये मिरकर समीन जावेद आणि सोलकर रिहान शब्बीर हे दोघेही रत्नागिरीचे रहिवासी आहेत.

मागणी नव्या ११० बसेसची, मिळाल्या फक्त २० बसेस

जळगाव एसटी विभागाच्या ताफ्यात बसची संख्या कमी, त्यात अनेक खराब बसेसमधून जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. वर्षाच्या सुरुवातीला राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विविध विभागांना एसटी बसेस टप्प्याटप्याने देत आहे. जळगाव जिल्ह्यासाठी ११० नव्या बसेसची मागणी महामंडळाने केली होती.केवळ फक्त २० बस मिळाल्या

परिवहनमंत्र्यांनी नव्या वर्षात राज्यातील सर्व जिल्ह्यांना मिळून २ हजार ६४० नव्या बसेस दिल्या जातील, असे सांगितले होते. त्यानुसार काही जिल्ह्यांना बसेस उपलब्ध होत आहेत. जळगाव जिल्ह्याला, फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील मुक्ताईनगराला आधी १० बसेस मिळाल्या. नंतर यावल तालुक्यात आगाराला १० अशा एकून २० बसेस मिळाल्या आहेत.

घराबाहेर पडतांना काळजी घ्या; यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे नागरिकांना आवाहन

यवतमाळ जिल्ह्यात दररोज पारा वाढत असल्याने उष्णतेची जाणवत आहेत. पारा 40:8 सेल्सिअस अंश पर्यंत पोहचला आहे. तापमानाचा पारा झपाट्याने वाढतोय.त्यामुळे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून, उन्हाचा तडाखा अधिकच वाढलाय. उन्हामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

लुटीच्या मालासह दोन आरोपी कळंब येथुन ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब पोलिस ठाणे हद्दीतील डिकसळ पाटी जवळ जबरी चोरीतील आरोपींना अटक केली आहे.हे आरोपी पारधी पिढी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने लल्ल्या उर्फ अनिल शिंदे व मिर्च्या उर्फ आकाश काळे यांना ताब्यात घेतले आहे.या दोघांनी पंधरा दिवसापुर्वी डिकसळ पाटी जवळ पती - पत्नीला आडवुन त्यांचे सोन्याचे दागिने लुटल्याचे कबुल केले दरम्यान आरोपीकडुन सोन्याची कर्नफुले,मंगळसूत्र मणी असा 27 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करुन आरोपींना अटक केली आहे.

संत तुकाराम साखर कारखान्याच्या एकवीस जागांसाठी बावीस उमेदवार रिंगणात

मावळच्या संत तुकाराम सहकारी साखर कारखाना यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी अखेर माघारीनंतर दोन दिवसांनी जाहीर केली.. या निवडणुकी साठी एकवीस जागांसाठी दोनशे सव्विस नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. त्यापैकी सव्विस नामनिर्देशन पत्रे दुबार निघाली, तर पाच नामंजूर करण्यात आली. त्यामुळे अंतिम टप्प्यात एकशे 95 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर एकूण बावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, मात्र संचालक मंडळातील जागांपेक्षा एक अर्ज जास्त राहिल्याने मतदान प्रक्रिया राबविणे भाग पडणार आहे....एकवीस पैकी अठरा जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र, ऊस उत्पादक गट क्र. एक हिंजवडी,ताथवडे या मतदारसंघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने येथे मतदान होणार आहे... विशेष म्हणजे, कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

तळेगावात मालमत्ता जप्ती, सिल आणि नळ कनेक्शन खंडित करण्याचा धडाका सुरू

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून सरकारी सुट्टीच्या दिवशीही त्यांच्याकडून कर वसुलीचे काम सुरू आहे. एकंदरीत मार्च महिन्याचे टारगेट पूर्ण करण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी झटून कामाला लागलेले असून ज्या नागरिकांनी कर भरलेला नाही अश्यांच्या मालमत्तेला टाळे ठोकून सील करण्याची काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत नगरपरिषदेच्या कर संकलन विभागाने आत्तापर्यंत पस्तीस मिळकती सील केल्या आहेत. तर आठशे नागरिकांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहे. चार सदनिकांचे नळ जोड खंडित केले आहे. दरम्यान या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत चौदा कोटी बावीस लाख रुपये कर परिषदेच्या तिजोरीत जमा झाला आहे..

आत्महत्येच्या गुन्ह्यातील प्राचार्यांसह 17 जण रजेवर

यवतमाळच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या प्राध्यापक संतोष उर्फ आप्पा गोरे आत्महत्या प्रकरणात गुन्हे दाखल झालेले प्राचार्य, तेरा प्राध्यापक आणि तीन लिपिक रजेवर गेले आहे. त्यामुळे दहाच प्राध्यापक, लिपिक कार्यरत आहे. उन्हाळी परीक्षा तोंडावर असून फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असताना अशावेळी महाविद्यालयातील सुमारे एक हजार आठशे विद्यार्थ्यांना अडचणींना समोर जावे लागत आहे.लोकनायक बाबूजी आणे महिला महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक संतोष उर्फ आप्पा गोरे यांनी धामणगाव रेल्वे स्थानकावर मालगाडी खाली येऊन आत्महत्या केली होती. बडनेरा रेल्वे पोलिसांनी सुसाईड नोट आणि तक्रारीवरून 34 जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

उल्हासनगरात सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरली!

उल्हासनगरात सोसायटीच्या पार्किंगमधून बर्गमॅन स्कुटर चोरल्याची घटना घडली आहे. कॅम्प ४ मधील साई प्रेरणा अपार्टमेंटमधली ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. साई प्रेरणा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुनील कारीरा यांनी रात्री त्यांची बर्गमॅन स्कुटर पार्किंगमध्ये उभी केली होती. रात्री एका चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. आपला चेहरा कॅमेरात दिसू नये, यासाठी त्याने तोंडाला रुमाल बांधून ही चोरी केली. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Pune : सलग ५१ लावणी गीते सादर करून पुष्पा चौधरी यांचा विश्वविक्रम

पुणे : मराठी लावणी संगीत जगाच्या पटलावर यावी आणि लावणीला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी यांनी सलग ५१ मराठी पारंपारिक लावणी गायनाचा विश्वविक्रम केला आहे. सलग ४ तास ४५ मिनिटे पुष्पा चौधरी यांनी लावणीची गाणी सादर करून विश्वविक्रम केला.

Pune Crime : अज्ञाताचे मुलींकडे पाहून अश्लील कृत्य; गुन्हा दाखल...

रात्री जेवायला जात असलेल्या तीन मुलींकडे पाहून एका अज्ञात व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याची घटना मंगळवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडली. या प्रकाराबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करून गुरुवारी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

पीडित विद्यार्थिनींनी लगेच त्याबाबत सुरक्षा रक्षकांना कल्पना दिली. मात्र सुरक्षारक्षकाने त्वरित प्रतिसाद न दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.