Crime News : १७ वर्षीय युवतीने गळफास घेत संपवले जीवन
esakal March 30, 2025 07:45 PM

नाशिक- शरणपूर रोड परिसरातील बेथेलनगर येथे १७ वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्त्या केली आहे. याप्रकरणी तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार व संशयित युवकाविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शनिवारी (ता. २९) दुपारी संशयित युवक बेथेलनगर परिसरात आला असता, मयत मुलीच्या नातलगांनी त्याला चोप देत सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

वेदांत पाटील (१९, रा उत्तमनगर, सिडको) असे संशयित युवकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आशला साठे (१७, रा. बेथेलनगर, तिबेटियन भाजी मार्केटसमोर) हिने शुक्रवारी (ता. २८) राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. शनिवारी (ता.२९) दुपारी बेथेलनगर परिसरात मयत मुलीच्या नातलगांनी गर्दी केली होती. त्याचवेळी संशयित वेदांत पाटील हा बेथेलनगर परिसरात आला असता, संतापलेल्या नातलगांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे.

संशयित पाटीलला अटक

मनिषा संतोष भालेराव (४०, रा. बेथेलनगर) यांच्या फिर्यादीनुसार, आशला ही त्यांच्या बहिणीची मुलगी असून, दहावी नापास असल्याने दोन वर्षांपासून ती घरीच होती. संशयित वेदांत पाटील याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करणार होते. परतु आशला १७ वर्षांचीच असल्याने ती १८ वर्षाची झाल्यानंतर पालक स्वत: लग्न लावून देण्यास तयार होते. परंतु त्यापूर्वी भेटण्यास मनाई केली होती. तरीही दोघे भेटत होते. तसेच, तो घरी येऊन तिला बाहेर फिरायला घेऊन जात असे. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून आशला ही तणावात होती.

संशयित वेदांत याने तिच्याशी लग्न करण्यास नकार देत दुसर्या मुलीशी प्रेम सुरू असल्याचे तिला सांगितले. तर, शुक्रवारी (ता.२८) सकाळी त्याने तिला मारहाणही केली. या नैराश्यातूनच तिने आत्महत्त्या केली. संशयित वेदांत हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याने जीवे मारण्याची धमकीही दिल्याने आत्तापर्यंत तक्रार न केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार सरकारवाडा पोलिसात संशयित वेदांत पाटील याच्याविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त करण्यासह मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.