टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएल स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. 18 वर्षे तो एकाच फ्रेंचायझीसाठी खेळणारा खेळाडू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणारा कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कोहलीने कोलकात्याविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद 59 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर, चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 30 चेंडूत 31 धावांची खेळी केली. या सामन्यात आरसीबीने चेन्नईचा 50 धावांनी पराभव केला आणि चेपॉकवर 17 वर्षानंतर विजय मिळवला. आरसीबीची स्पर्धेतील सुरुवात चांगली झाली असून सध्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. त्यासाठी बीसीसीआयकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं. पण असं असताना किंग कोहली ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बिग बॅश स्पर्धेत सहभागी होणार होणार आहे. पुढील दोन हंगामांसाठी सिडनी सिक्सर्सकडून खेळणार आहे.सिडनी सिक्सर्सने 1 एप्रिल रोजी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर घोषणा केली की त्यांनी पुढील दोन बिग बॅश लीग हंगामांसाठी या स्टार फलंदाजाला करारबद्ध केले आहे. विराट कोहली परदेशी लीगमध्ये खेळणारा पहिला सक्रिय भारतीय खेळाडू होईल का? पण यात एक ट्विस्ट आहे.
कोहली हा इंडियन प्रीमियर लीगमधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 8094 धावा केल्या आहेत. यात 8 शतके आणि 56 अर्धशतके आहेत. बीसीसीआयच्या नियमांनुसार, भारतीय खेळाडू निवृत्त होईपर्यंत विदेशी लीगमध्ये खेळू शकत नाहीत. जर एखादा भारतीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेट तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तरच तो विदेशी लीगमध्ये खेळू शकतो. पण मंगळवारी सकाळी सिडनी सिक्सर्सच्या एका ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडाली.”किंग कोहली! विराट कोहली पुढील दोन हंगामांसाठी अधिकृतपणे सिक्सर्सकडून खेळेल!” असे सिक्सर्सने ट्विटमध्ये म्हटले आहे. पण त्यानंतर सिक्सर्सने स्वतःच खुलासा करत सांगितलं की, हे ट्विट त्यांनी एप्रिल फूल डे साजरा करण्यासाठी केलेला एक विनोद होता.
विराट कोहलीच्या आरसीबी फ्रेंचायझीला अजूनही जेतेपदाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे 18व्या पर्वात जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होईल का? याकडे लक्ष लागून आहे. आरसीबीने सलग दोन सामने जिंकून स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. आता तिसरा सामना 2 एप्रिलला बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. आता विजयाची हॅटट्रीक साधेल का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.