सांगली : देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोल्हापूर रोडवरील अंकली पुलानजीक केली. विकास अर्जुन चौगुले (३२, रा. माळवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलिस अंमलदार विनायक सुतार, ऋतुराज होळकर आणि सूरज थोरात यांना संशयित एकजण पिस्तूल बाळगून थांबला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अंकली पुलानजीक सापळा लावला. संशयित विकास चौगुले याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे ६० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. त्याचबरोबर दोन जिवंत काडतुसेही पोलिसांच्या हाती लागली.