डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट हे त्यांच्या गुंतवणुकीविषयीच्या तत्वज्ञानामुळे जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे प्रसिद्ध आहेत. ९४ वर्षीय बफेट यांची सध्याची जीवनशैली पाहिली आणि जीवनाविषयी विचार ऐकले, तर अचंबित व्हायला होते. जगभरातील श्रीमंतांच्या यादीत वर्षांनुवर्षे वरचा क्रमांक असलेला हा मनुष्य आजही साध्या राहणीमानाला प्राधान्य देतो. आयुष्यात प्रत्येकाने आनंदी राहण्याला प्राधान्य दिले पाहिजे आणि तो आनंद नक्की कशात आहे, हे आपले आपण शोधून काढले पाहिजे असे ते म्हणतात. स्वतःच्या आनंदी जीवनाचे रहस्य पुढील गोष्टींमध्ये दडले आहे, असे ते म्हणतात.
घर असावे घरासारखे!वॉरेन बफेट आजही १९५८ मध्ये बांधलेल्या त्यांच्या जुन्या घरात राहतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोट्यवधी रुपये खर्च करून ते सहज नवे आलिशान घर खरेदी करू शकत असले, तरी या जुन्या घरासोबत त्यांच्या आठवणी जुळलेल्या आहेत, ज्या पैशांमध्ये मोजता येणार नाहीत. त्या घरात राहताना होणारा आनंद नव्याने बांधलेल्या आणि अत्यानुधिक सोयी असलेल्या घरात मिळणार नाही, असे ते म्हणतात.
स्वातंत्र्य हीच श्रीमंती !बफेट यांच्या मते, जी श्रीमंती आपल्याला मनासारखे जगण्याचे स्वातंत्र्य देते ती खरी श्रीमंती. नोकरी व्यवसायातदेखील यशस्वी होण्याचे गमक सांगताना ते म्हणतात, की आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करा म्हणजे दीर्घकाळ तुम्ही संपत्ती कमवू शकाल आणि आनंदीदेखील होऊ शकाल; तसेच आजूबाजूच्या लोकांसाठी आंनद निर्माण करू शकाल. तुमचे वय वाढत जाईल तसतसे तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी चांगले बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढायला हवी; अन्यथा तुम्ही कमावलेल्या पैशाला काहीही अर्थ नाही.
सुसंगती सदा घडो...बफेट सांगतात, की आपले जीवन समृद्ध करू शकतील अशा व्यक्तींच्या सहवासात रहा आणि त्यांच्याकडून सातत्याने सल्ला घ्या. तुमच्या क्षेत्रात जे लोक तुमच्यापेक्षा अधिक अनुभवी आणि हुशार आहेत अशा लोकांसोबत काम करा. बर्कशायर हॅथवे या त्यांच्या कंपनीत सल्लागार म्हणून असलेले चार्ली मुंगेर हे बफेट यांचा उजवा हात मानले जायचे आणि कंपनीतील कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी बफेट त्यांचा सल्ला घायचे. त्यांच्या सहभागाशिवाय आणि सल्ल्याशिवाय बर्कशायर हॅथवे कंपनी एवढ्या उच्च पातळीवर पोहोचू शकली नसती, असे बफेट कायम सांगतात आणि सुसंगतीचे महत्त्व अधोरेखित करतात.
स्वतःमध्ये गुंतवणूक....वॉरेन बफेट सल्ला देतात, की स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःमध्ये गुंतवणूक करा. अशी गुंतवणूक सर्वाधिक परतावा देते. स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी बफेट यांनी नियमितपणे वाचन करण्याचा पर्याय निवडला आहे. या वयातही ते त्यांना उपलब्ध असलेल्या एकूण वेळेपैकी ८० टक्के वेळ वाचनासाठी देतात. जगभरातील ज्ञान बसल्याजागी मिळवण्याचा वाचन हा उत्तम मार्ग आहे, असे ते सांगतात.
वस्तू नको, अनुभव जमवा केवळ वस्तू गोळा करण्यात आनंद मानण्यापेक्षा अनुभव जमा करण्यात आनंद शोधा, असे सांगून बफेट म्हणतात, की जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी जमा झाल्यानंतर गोष्टी जमा करण्याची इच्छा कधीतरी थांबायला हवी. वस्तूंमध्ये अडकून पडण्यापेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून त्यांचे अनुभव जमा करा आणि त्यासाठी पैसे खर्च करा, असा सल्ला ते देतात.
थोडक्यात, आयुष्यात संपत्ती जमा करण्यासोबत त्या संपत्तीचा योग्य प्रकारे विनियोग करण्यालादेखील प्राधान्य द्या, तरच तुम्हाला खरा आनंद मिळेल, असे बफेट सांगतात.