पुणे : पंधरा दिवसांपासून उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील धरणांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पाणीपातळी वेगाने कमी होऊ लागली आहे. मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असल्याने पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जोरदार पावसामुळे लहान व मध्यम स्वरूपामध्ये असलेली ऊर्ध्व पैनगंगा, गोसी खुर्द, निम्न वर्धा, हतनूर, खडकवासला, चासकमान, वीर, गुंजवणी, घोड, मुळा, जायकवाडी, उजनी, कोयना असे अनेक प्रकल्प भरल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व काही प्रमाणात शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली होती. परंतु रब्बी हंगामात पाण्याची मागणी वाढल्यामुळे जानेवारीपासून धरणांतील पाणीपातळी कमी झाली आहे.
राज्यात जलसंपदा विभागाकडील लहान, मध्यम व मोठे अशा एकूण दोन हजार ९९७ प्रकल्पांत १४२९.७७ टीएमसीपैकी ६७८.७२ टीएमसी (१९.२२४.७५ दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच ४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात ४०.१६ टक्के पाणीसाठा होता.
सध्या मराठवाड्यातील धरणांत अजूनही चांगला पाणीसाठा उपलब्ध असून, एकूण ९२० धरणांत अवघा ११९.२३ टीएमसी म्हणजेच ४६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच धरणात अवघा २१ टक्के पाणीसाठा होता. यंदा चांगला पाणीसाठा असून पैठण, माजलगाव, रोशनपुरी, हिरडपुरी, येलदरी, माजलगाव, मांजरा, मंगरूळ, विष्णुपुरी, तेरणा, लिंबाळा, मदनसुरी, शिवनी, टाकळगाव देवळा, निम्नदुधना या धरणांत पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. तर काही धरणांत अत्यंत कमी पाणीसाठा आहे.
नागपूर विभागातील ८३ धरणांत १०८.०१ टीएमसी म्हणजेच ४५.३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अमरावती विभागातील २६४ धरणांत ९९.५७ टीएमसी म्हणजेच ५४ टक्के पाणी उपलब्ध आहे. नाशिक विभागातील ५३७ धरणांत १२९.८५ टीएमसी म्हणजेच ४८ टक्के साठा उपलब्ध आहे. पुणे विभागातील ७२० धरणांत ३५०.९६ टीएमसी म्हणजेच ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कोकण विभागातील १७३ धरणांत ७६.५१ टीएमसी म्हणजेच ५४ टक्के पाणीसाठा आहे.
मोठ्या प्रकल्पात ४७ टक्के पाणीसाठाराज्यात कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १३८ मोठी धरणे आहेत. या धरणांत ७२०.७५ टीएमसी म्हणजेच सरासरी ४७.९९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पांत ३९.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी जवळपास ९ टक्क्यांनी अधिक पाणीसाठा आहे. यामध्ये नागपूर विभागात सध्या ८५.१० टीएमसी म्हणजेच ४५ टक्के, अमरावती विभागात ६३.३४ टीएमसी म्हणजेच ५० टक्के, मराठवाड्यातील धरणांत १३५.५८ टीएमसी म्हणजेच ५३ टक्के, नाशिक विभागात ८६.२० टीएमसी म्हणजेच ५१ टक्के, पुणे विभागात ३०२.९५ टीएमसी म्हणजेच ४५ टक्के, कोकण ४७.५५ टीएमसी म्हणजेच ४७ टक्के पाणीसाठा आहे.