नागपूर : सहकारी बँकांची समृद्धी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे राज्य किंवा जिल्हा बँकेने सहकारी बँकांना शक्ती देणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेची संस्थापक प्रशासक म्हणून नियुक्ती-पदभार स्वीकृतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदींची उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, ‘‘जिल्हा सहकारी बँकेला शक्तिशाली इंजिनची आवश्यकता होती. त्यादृष्टीने राज्य सहकारी बँकेने घेतलेली जबाबदारी स्वागतार्ह आहे. साखर आणि इथेनॉल उद्योगाला देखील बँकेने मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सहकारी बँकांना शक्ती मिळाली तर शेतकऱ्यांनाच फायदा होईल. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्याचे मार्ग खुले होतील. बँकेचे भविष्य बदलायला सुरुवात झाली असून, त्याचा लाभ ग्रामीण जनतेला नक्की होईल,’’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.