दादू ः (आपुलकीने फोन करत) म्यांव म्यांव... म्यांव म्यांव..!
सदू ः (कोरडेपणाने फोन उचलत) बोल दादूराया... वाघासारखा वाघ, पण मांजराचे आवाज कसले काढतोस?
दादू ः (डोळे मिचकावत) गंमत केली रे थोडीशी! कसा आहेस? तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!!
सदू ः (घाईत) तुलाही! आज काय? श्रीखंड की शिक्रण?
दादू ः (मिटक्या मारत) दोन्ही!
सदू ः (थंडपणाने) मजाय एका माणसाची!! हल्ली फोन करायलाही तुला वेळ मिळायला लागला की!!
दादू ः (समाधानानं) खूप वर्षांनी चांगली फुर्सत मिळाली आहे, का सोडायची?
सदू ः (घाईघाईनं आवरतं घे)... पण ख्यालीखुशालीचा फोन केला असशील तर आता ठेव! मला खूप कामं आहेत! आज आमचा पाडवा मेळावा आहे, त्याची तयारी करतोय!!
दादू ः (तोंड वेंगाडत) त्यात तयारी कसली करायची? स्टेजवर जायचं, आणि पाऊण तास ठणाणा करून खाली उतरायचं!!
सदू ः (संयम ठेवत) तुम्ही करत असाल तसं, मी गंभीरपणाने विचार व्यक्त करतो! आख्खा महाराष्ट्र मी काय बोलणार याकडे लक्ष ठेवून असतो!! तुला नाही कळायचं ते!! ठेव तू फोन!!
दादू ः (सपशेल दुर्लक्ष करत) पक्षाचे मेळावे किनई, दसऱ्यालाच करावेत! पाडव्याला श्रीखंड खावं!!
सदू ः (सात्त्विक संतापाने) जो उठतो तो दसऱ्याला मेळावे घेतो! गेल्या दसऱ्याला पाच पाच मेळावे झाले! कोण कुठं काय बोलतंय, कळत नाही! एका दसऱ्याला किती जणांनी एकच रावण जाळायचा?
दादू ः (युक्तिवाद करत) असल्या गोष्टींसाठी दसराच बरा! जे काय असेल ते विचारांचं सोनं लुटलं की वर्षभर मोकळे!!
सदू ः (युक्तिवाद खोडून काढत) लोक कंटाळले असतील आता तुमच्या दसऱ्याला! दसरा दसरा आणि कुणावर तरी घसरा!! मग टीव्हीवाल्यांनासुद्धा कॅमेरे कमी पडतात! शेवटी मी दिवस बदलला! तुमचा दसरा, तर आमचा पाडवा, ज्जा!!
दादू ः (टोमणा मारत) शिमगा मेळावा तरी घ्यायचा!!
सदू ः (घुश्शात) दादूराया, मस्करी आपल्याला आवडत नाय, सांगून ठेवतो!! मी कधी कुणाच्या नावानं शिमगा करत नाही, मुद्दे मांडतो!! हिसाब किताब करतो!
दादू ः (कुतूहलानं) मग आज कुणाविरुद्ध तोफा धडाडणार?
सदू ः (रहस्य बर्करार ठेवत) कळेल, कळेल!!
दादू ः (आग्रह करत) असं काय करतोस? कसाही असलास तरी भाऊ आहेस माझा!! मला नाही सांगणार?
सदू ः (चुळबुळ करत) मी भाषणाची तयारी करतोय! नंतर फोन कर!!
दादू ः (आश्चर्यानं) कसलं भाषण?
सदू ः (दुप्पट आश्चर्यानं) हा काय प्रश्न झाला? आज आमचा पाडवा मेळावा नाही का? मी आमच्या पक्ष कार्यकर्त्यांना पुढल्या संवत्सरात पक्षाची दिशा काय असेल, याचं मार्गदर्शन करणार आहे!!
दादू ः (प्रचंड हसत) हाहा हाहा!!
सदू ः (संतापून) दादूऽऽ.... माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नकोस! नापास होशील!!
दादू ः (हसू आवरत) आता कसली दिशा देणार? सगळ्या दिशांना हिंडून झालं की!!
सदू ः (संयम ठेवत) महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी मी कुठल्याही दिशेला जाईन! तुमच्यासारखं नाही आमचं! दिसली खुर्ची, लागली मिर्ची!! दादूराया, माझा संयम सुटायच्या आत तू ठेव फोन!!
दादू ः (प्रयत्नपूर्वक) बरं बरं! रागावू नकोस! पण तुला तरी दिसलीये का ती दिशा?
सदू ः (वैतागून) तुला काय करायचंय?
दादू ः (पोक्तपणे सल्ला देत) म्हणून म्हणत होतो, दसऱ्याच्या भाऊगर्दीतच उरकावा मेळावा! आता झाली ना पंचाईत? जय महाराष्ट्र.