नव्या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकराचे दर
esakal March 31, 2025 11:45 AM

अनिरुद्ध राठी - चार्टर्ड अकाउंटंट- सीए

नवे आर्थिक वर्ष एक एप्रिल २०२५ पासून सुरू होत आहे. या नव्या आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी प्राप्तिकराच्या नव्या करप्रणालीमधील दरात बदल करण्यात आले आहेत. हे बदल वैयक्तिक करदाते, हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ), कंपनी, भागीदारी फर्म आदी विविध गटातील करदात्यांसाठी लागू आहेत. त्यामुळे हे नवे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

कलम ८७अ अंतर्गत ६० हजार रुपयांपर्यंत करसवलत मिळते, ज्यामुळे १२ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर शून्य होतो. पगारदार आणि पेन्शनधारकांना ७५ हजार रुपयांची प्रमाणित वजावट (स्टँडर्ड डीडक्शन) मिळते, ज्यामुळे १२.७५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होते. कलम ८७अ अंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या सर्व वैयक्तिक करदात्यांना ही सवलत मिळते.

भागीदारी (पार्टनरशिप फर्म)

भागीदारी किंवा एलएलपी (LLP – LIMITED LIABILITY PARTNERSHIP) असलेल्या करदात्यांना त्यांच्या एकूण करपात्र उत्पन्नाच्या फ्लॅट ३० टक्के प्राप्तिकर भरावा लागतो. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास येणाऱ्या प्राप्तिकरावर १२ टक्के अतिरिक्त सरचार्जही भरावा लागेल.

लोकल ॲथॉरिटी

लोकल ॲथॉरिटीच्या बाबतीत करगणना ही वर नमूद केलेल्या भागीदारी करदात्यांसाठीच्या करगणनेसारखीच आहे. या करदात्यांना त्यांच्या एकूण करपात्र उत्पन्नाच्या ३० टक्के प्राप्तिकर भरावा लागतो. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास येणाऱ्या एकूण करावर १२ टक्के अतिरिक्त सरचार्जही भरावा लागतो.

कंपनी

स्वदेशी कंपनी असेल आणि मागील वर्षात तिची एकूण उलाढाल ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नसल्यास; त्या कंपनीला एकूण करपात्र उत्पन्नाच्या २५ टक्के प्राप्तिकर भरावा लागतो. याव्यतिरिक्त अन्य बाबतीत एकूण उत्पन्नाच्या ३० टक्के कर भरावा लागतो. स्वदेशी कंपनीच्या बाबत उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त परंतु, दहा कोटी रुपयांपर्यंत असल्यास प्राप्तिकरावर सात टक्के सरचार्ज भरावा लागतो. उत्पन्न दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास १२ टक्के सरचार्ज भरावा लागेल.

स्वदेशी कंपन्यांच्या बाबतीत कलम ११५ बीएए आणि कलम ११५ बीएबीमध्ये दिलेल्या अटींचे पालन करून कराचा दुसरा पर्याय निवडण्याचा पर्यायसुद्धा दिला गेला आहे. हे पर्याय स्वीकारल्यास अशा स्वदेशी कंपन्यांना कलम ११५ बीएए आणि कलम ११५ बीएबी अंतर्गत अनुक्रमे २२ टक्के आणि १५ टक्के या दराने प्राप्तिकर भरावा लागेल; तसेच या दोन्हींसाठी सरचार्ज केवळ १० टक्केच राहील. हे थोडे क्लिष्ट असल्यामुळे याबाबतीत करसल्लागार अथवा चार्टर्ड अकाउंटंट यांचा सल्ला घ्यावा.

वरील नमूद सर्वच करदात्यांसाठी सरचार्ज लागू होत असेल, तर त्यावर मार्जिनल रिलीफ मिळेल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येणाऱ्या प्राप्तिकर आणि सरचार्जसह (ज्या ठिकाणी लागू आहे) रकमेवर चार टक्के आरोग्य आणि शैक्षणिक उपकरसुद्धा भरावा लागेल.

(करदर व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) आदी करदात्यांसाठी)

करपात्र उत्पन्न नवे दर (आर्थिक वर्ष २५-२६ साठी) करपात्र उत्पन्न आर्थिक वर्ष २४-२५चे दर

  • रुपये ४,००,००० पर्यंत ०% रुपये ३,००,००० पर्यंत ०%

  • रुपये ४,००,००० ते ८,००,००० ५% रुपये ३,००,००० ते ७,००,००० ५%

  • रुपये ८,००,००० ते १२,००,००० १०% रुपये ७,००,००० ते १०,००,००० १०%

  • रुपये १२,००,००० ते १६,००,००० १५% रुपये १०,००,००० ते १२,००,००० १५%

  • रुपये १६,००,००० ते २०,००,००० २०% रुपये १२,००,००० ते १५,००,००० २०%

  • रुपये २०,००,००० ते २४,००,००० २५% रुपये १५,००,००० च्या वर ३०%

को-ऑपरेटिव्ह सोसायटी करपात्र उत्पन्न प्राप्तिकर दर
  • रुपये १०,००० पर्यंत १०%

  • रुपये १०,००० ते २०,००० २०%

  • रुपये २०,००० च्या वर ३०%

  • एक कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास

  • १२ टक्के सरचार्ज (अधिभार)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.