मुंबई : ‘‘चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. अभिनेता विकी कौशलमुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान समजले काय,’’ असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ‘‘सध्या माथी भडकवण्याचे काम सुरु आहे. इतिहासाच्या मुळाशी गेलात तर तुमच्या अपेक्षांची भांडी फुटतील,’’ अशा शब्दांत त्यांनी याबाबत राजकारण करणाऱ्यांना फटकारले. छत्रपती शिवाजी महाराज हा एक चमत्कार आहे. हा एक विचार आहे असे राज ठाकरे म्हणाले.
गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. कुंभमेळा, धर्म, राजकारण, प्रदूषण या मुद्यांवरुन राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांवर जोरदार हल्लाबोल केला. याचबरोबर प्रदूषित गंगा नदीचा व्हिडिओ दाखवीत महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती देखील किती बिकट आहे, यावर ठाकरे यांनी भाष्य केले. माझा विरोध कुंभमेळ्याला नसून गंगा नदीच्या प्रदूषणाला आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर देखील त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्रासह मुंबईत मराठी बोलला नाहीत तर कानफटीतच बसणार, असाही दम त्यांनी परप्रांतीयांना दिला.
मनसेच्या या मेळाव्यात राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील नद्यांवरून सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. कुंभमेळ्यातील गंगेच्या स्थितीपासून राज्यातील ५५ नदीपट्टे प्रदूषित असल्याचे सांगत मुंबईत ४ नद्या ‘वारल्या’ नव्हे मारल्या. एक मिठी नदी मरणासन्न अवस्थेत
आहे, असे म्हणत राज ठाकरेंनीनद्यांवर बोललो की धर्म आडवा येणार का,असा संतप्त सवाल केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कामाला लागण्याचा आदेशही ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला.
ते म्हणाले, ‘‘गंगा साफ करा, असे प्रथम माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते. तेव्हापासून गंगा साफ होत होते. कुंभमेळ्यात लाखो लोक अंघोळ केल्यानंतर आजारी पडले आहेत. प्रश्न पाण्याच्या स्थितीचा आहे. कुंभमेळ्याचा अपमान नाही,’’ यावेळी राज ठाकरेंनी गंगेची स्थिती दाखवणार व्हिडिओ दाखवला. धर्माच्या गोष्टी मला कोणी सांगू नये, असेही ठाकरे म्हणाले. देशभर विद्युतदाहिन्या झाल्या पाहिजेत. जंगले जगवली पाहिजेत. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे उद्यान जगात कोठेही नाही. पण सध्या सगळीकडे जंगलतोड सुरु आहे, असे ठाकरे म्हणाले.
‘चांगल्या निर्णयाला पाठिंबा देऊ’भाषणाच्या सुरवातीलाच राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशिन वरून सरकार वर टोलेबाजी केली. त्यानंतर राज्यातील विविध विषयांचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देताना तुमच्या प्रत्येक चांगल्या निर्णयावर पाठीमागे आम्ही कायमच उभे राहू. मात्र आम्ही काय म्हणतो ते ऐका आणि निर्णय घ्या. तसेच एवढे सुसंस्कृत राज्य त्यांनी व्यवस्थित चालवावे, असा सल्लाही ठाकरे यांनी फडणवीस यांना दिला.