सुधाकर कुलकर्णी - सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
आपल्या देशात आर्थिक समावेशकता वाढीमध्ये यूनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’चा सहभाग खूप मोठा आहे. एकूण डिजिटल व्यवहारांच्या सुमारे ८५ टक्के व्यवहार हे ‘यूपीआय’द्वारे म्हणजेच भीम, गुगल पे, फोन पे यांसारख्या मोबाईलअॅपचा वापर करून होत असल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस ‘यूपीआय’चा वापर वाढतच आहे, त्याचबरोबर यातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचेही दिसून येत आहे. फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी ‘एनपीसीआय’ ‘यूपीआय’ सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करत असून, त्याचाच एक भाग म्हणून एक एप्रिल २०२५ पासून काही नव्या धोरणात्मक सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या बदलांची माहिती वापरकर्त्यांना असणे आवश्यक आहे.
होणारे बदलआता एक एप्रिल २०२५ पासून आपल्या बँक खात्याशी जोडलेला (लिंक असलेला) मोबाईल क्रमांक निष्क्रिय (इनअॅक्टिव्ह)असेल, तर ‘यूपीआय’ अॅपद्वारे आपल्या बँक खात्यातून रक्कम पाठविण्याची किंवा बँक खात्यात रक्कम जमा करून घेण्याची सुविधा थांबविली जाईल.
‘एनपीसीआय’च्या आदेशानुसार आपला बँक खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक ९० दिवसांहून अधिक काळ निष्क्रिय (इनअॅक्टिव्ह)असेल, तर तो क्रमांक आपल्या बँक खात्याशी जोडलेला राहणार नाही व ही कार्यवाही अापोआप होणार आहे. यामुळे आपल्या खात्यावर अनधिकृत व्यवहार होणार नाहीत; तसेच फसवणुकीचा धोका कमी होईल. यासाठी ग्राहकांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून आपला मोबाईल क्रमांक अॅक्टिव्ह असल्याबाबतची खात्री करून घ्यावी. आपण मोबाईल क्रमांक बदलला असेल, तर त्वरित संबंधित बँकेस कळवावे व आपला बदललेला नंबर आपल्या खात्याला जोडला गेला आहे, याची खात्री करून घ्यावी.
‘एनपीसीआय’ने बँका; तसेच सर्व ‘यूपीआय’ अॅपना इनअॅक्टिव्ह मोबाईल क्रमांकाचे रेकॉर्ड दर आठवड्याला अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत; तसेच मोबाईल कंपन्यांनीसुद्धा इनअॅक्टिव्ह क्रमांक नव्या ग्राहकांना प्राधान्याने देण्याचे सुचविले आहे. यामुळे इनअॅक्टिव्ह क्रमांकांची संख्या कमी होऊन यातून होणारे फसवणुकीचे प्रमाण कमी होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.
‘यूपीआय पूल ट्रॅन्झ्कॅशन’ सुविधा रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यामध्ये ‘यूपीआय’ वापरकर्त्यास त्याच्या ‘यूपीआय’वर पेमेंट रिक्वेस्ट पाठविली जाते व यातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे दिसून येते. मात्र, या प्रस्तावाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
थोडक्यात, ‘यूपीआय’ची वाढती उपयुक्तता विचारत घेऊन याद्वारे होणारे पेमेंट जास्तीतजास्त सुरक्षित व्हावे यासाठी ‘एनपीसीआय’ सातत्याने आवश्यक ते बदल करीत आहे. मात्र, ग्राहकांनीदेखील ‘यूपीआय’ वापरताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.