लंबोर्गिनी कारने फुटपाथवर बसलेल्या दोन मजुरांना जोराची धडक दिली. या धडकेत दोन्ही मजूर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं आहे. जखमींच्या कुटुंबियांकडून तक्रार करण्यात आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. नोएडाच्या सेक्टर ९४ मध्ये ही घटना घडलीय. सोशल मीडियावर या घटनेनंतरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडीओत लंबोर्गिनी कार डिवायडरवर घुसल्याचं दिसून येतंय. त्यावेळी एक जण चालकाला स्टंट दाखवतोयस का असं म्हणत जाब विचारतो. किती लोक मेलेत माहितीय का? असंही म्हणतो. यावर ड्रायवर कुणी मेलंय का इथं? असं विचारताना दिसतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर ९४ मध्ये फुटपाथवर चार मजूर बोलत बसले होते. यावेळी भरधाव वेगात लाल रंगाची लंबोर्गिनी अचानक त्यांच्या दिशेने आली. कारने डिवायडरवर असलेल्या झाडाला धडकल्यानंतर दोन मजुरांना धडक दिली. एक मजूर नाल्यात पडला तर दुसरा रस्त्यावर पडून जखमी झाला.
स्थानिकांना नाल्यात पडलेल्या मजुराला बाहेर काढलं. दोघांनाही स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. कार चालकाला घटनास्थळावरील लोकांनी पकडून पोलिसांच्या हाती सोपवलं. जखमी मजूर झारखंडचे रहिवासी असल्याची माहिती समजते. अपघाताची माहिती दोघांच्याही कुटुंबियांना देण्यात आलीय. तर कार चालवणारा राजस्थानच्या अजमेरचा असून त्याचं नाव दीपक कुमार असं आहे.
अपघातानंतरचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात चालक तरुण कुणी मेलंय का इथं असं विचारताना दिसतो. कार चालकाने एक्सिलेटर वाढवल्याचंही कबूल केलं. पोलिसांनी म्हटलं की, दीपक गाड्या खरेदी आणि विक्रीचं काम करतो. त्याला एका व्यक्तीसाठी लंबोर्गिनी खरेदी करायची होती. टेस्ट ड्राइव्ह करताना ही दुर्घटना घडली.