जालना : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. अल्पवयीन मुलं देखील गुन्हेगारीच्या जाळ्यात अन् नशेच्या गर्तेत अडकून आयुष्य बरबाद करत आहेत. राज्यात या गु्न्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला आहे की नाही? असाच सवाल सध्या उपस्थित होत आहेत. याचदरम्यान, जालन्यात एका १३ वर्षीय विधीसंघर्ष बालकाने पाण्यात मोबाईल फेकल्याच्या रागातून एका ४१ वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिराबाई उर्फ संध्या बांडारे असं मयत महिलेचं नाव असून जालन्यातील अंतरवाली टेंभी या गावामध्ये २५ मार्च रोजी शेतामध्ये या महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी तीर्थपुरी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली. मयत महिलेनं विधीसंघर्षग्रस्त बालकाचा मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याचा राग या मुलाच्या मनात होता. या बालकाने महिला शेतामध्ये झोपली असताना तिच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. दरम्यान, पोलिसांनी या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाईसाठी या बालकाला बालन्यायमंडळासमोर हजर करणार आहेत. अशी माहिती जालन्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे.
बीडमध्ये पुन्हा जीवघेणा हल्ला
दरम्यान, मध्ये देखील गुन्हेगारी काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा बीड जिल्हा हादरला आहे. बीडमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणावर कोयत्याने सपासप वार झाल्याची घटना आज सकाळी ९ च्या सुमारास घडली आहे. जखमी तरुणावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील पोखरी रोडवर सारडा नगरीजवळ राजकुमार करडे (वय ३०, रा. गवळीपुडा, अंबाजोगाई) याच्यावर दोन तरुणांनी हल्ला केला. त्याच्या पाठीवर कोयता सदृश्य धारदार हत्याराने वार केले. आरोपींनी गळ्यावर, डोक्यात आणि पाठीवर वार करुन पीडित तरुणाला गंभीर जखमी केले.