Odisha Train Accident : ओडिशात रेल्वेचे अकरा डबे घसरले; एनडीआरएफचे बचावकार्य; एका प्रवाशाचा मृत्यू, सात जखमी
esakal March 31, 2025 12:45 PM

स्मृती सागरिका कनुनगो

भुवनेश्वर : ओडिशातील कटक जिल्ह्यातील नेर्गुंडी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी दुपारी बाराच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात एसएमव्हीटी बंगळूर-कामाख्य सुपरफास्ट एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले.

या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे समजते. त्याचप्रमाणे या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. रेल्वे प्रशासनाने येथे तत्काळ बचावकार्य हाती घेतले असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.

त्याचप्रमाणे पूर्व किनारा रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी अपघात मदत रेल्वेगाडी आणि वैद्यकीय मदत रेल्वेगाडी घटनास्थळी पाठवली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रेल्वेच्या खुर्दा रोड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि पूर्व किनारा रेल्वेचे महाव्यवस्थापक घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण मदतकार्याचा आढावा घेत आहेत. घटनास्थळी बचावकार्य अद्यापही सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.