Unseasonal Rain : राज्यावर अवकाळीचं संकट, जळगावात एकाचा मृत्यू, पुण्यात ३ दिवस वादळी पावसाचा इशारा
Saam TV April 01, 2025 03:45 PM

Unseasonal Rain Hits Maharashtra: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. एक ते ३ एप्रिल पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल आहे. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, अकोला, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईमध्ये मात्र तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. अवकाळी पावसामुळे जळगावमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर एका व्यक्तीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी गारपीठ शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत पडला आहे. पिकांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, अंबा महागण्याची चिन्हे आहेत.

अवकाळीमुळे एकाचा मृत्यू -

जळगाव तालुक्यातील धानवड परिसरामध्ये विजांच्या कडकडाटात पावसाने सुरूवात केली. अवकाळीमुळे जळगावमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये वीज अंगावर पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर एकावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. वीज अंगावर पडल्यानंतर नागरिकांनी अंकुश राठोड व आजोबा शिवाजी राठोड या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच अंकुशचा मृत्यू झाला होता तर गंभीर शिवाजी राठोड यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय.

पुण्यावर अवकाळीचे सावट, ३ दिवस धो धो बरसणार -

पुण्यात १ ते ३ एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे पुणेकरांना उष्णतेपासून मिळणार तात्पुरता दिलासा मिळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पण पावसानंतर मात्र पुणे शहरात उष्णता कायम राहणार आहे. पावसानंतर पुणे शहराचे तापमान ३७° सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IMD ने दिलेल्या सात दिवसीय हवामान अंदाजानुसार,१ ते ३ एप्रिल दरम्यान वादळ आणि पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात उष्णतेपासून आराम मिळू शकतो. या कालावधीनंतर, आकाश पुन्हा निरभ्र होईल आणि तापमान ३७° सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहील

बुलढाण्यात अवकाळी पाऊस...!

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तसेच चिखली, मेहेकर तालुक्यात सुद्धा पाऊसाने हजेरी लावली, त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असल्याचे दिसून आले.या वातावरणात गारवा निर्माण झाला असून गहू , कांदा या पिकांना नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अकोल्यात अवकाळीचा तडाखा -

अकोल्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे.. मुर्तीजापुर तालुक्यातल्या निपाणा गावात देखील अवकाळी पाऊस झाला आहे.. आज रात्री आठ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि जवळपास 15 ते 20 मिनिट पाऊस सुरू होता.. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकासह कांदा पिकाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

जळगाव जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. हवामान तज्ज्ञांनी देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. मात्र, या पावसामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.