वाळलेल्या झाडाची फांदी अंगावर पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू; पत्नीला नोकरीच्या ठिकाणी सोडून गावी परतताना दुर्घटना
esakal April 01, 2025 03:45 PM

करंजफेण ते अनुस्कुरा मार्गावर खूप मोठ-मोठी झाडे आहेत. धोकादायक स्थितीत आहेत. काही झाडे तर पूर्णपणे वाळली असून, ती काढून टाकण्याची गरज आहे.

शाहूवाडी : गुढीपाडवा (Gudi Padwa) सणासाठी सुटीवर आलेल्या पत्नीला नोकरीच्या ठिकाणी सोडून गावी परतत असताना वाळलेल्या झाडाची (Tree) फांदी अंगावर पडल्याने कणेरीपैकी पोवारवाडी (ता. पन्हाळा) येथील धनाजी गोविंद पोवार (वय ३४) या युवकाचा मृत्यू झाला. कोल्हापूर (Anuskura Ghat) मार्गावरील कांटे (ता. शाहूवाडी) येथे काल दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबतची अधिक माहिती अशी, धनाजी पोवार यांची पत्नी श्वेता पोवार या रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील लांजा या गावी शिक्षिका आहेत. पाडव्यानिमित्त सुटीला त्या गावी आल्या होत्या. त्यांना सोडण्यासाठी धनाजी आपली मोटारसायकल (एमएच ०९, ईएक्स २२६९) घेऊन गेले होते. त्यांना सोडून घरी परत येताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कांटे फाटा येथील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका वाळलेल्या झाडाची फांदी अचानकपणे तुटून त्यांच्या अंगावर पडली.

यामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटला व ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघातानंतर एका तासापेक्षा अधिक वेळ झाला, तरी त्यांना कोणीही मदत केली नाही. करंजफेण येथील नागरिकांना माहिती मिळताच काहींनी १०८ ॲम्ब्युलन्सला म्बुलन्सला फोन करून कोल्हापूर येथील सीपीआर येथे त्यांना दाखल केले. मात्र, तेथे तपासून त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

धोकादायक झाडे

करंजफेण ते अनुस्कुरा मार्गावर खूप मोठ-मोठी झाडे आहेत. धोकादायक स्थितीत आहेत. काही झाडे तर पूर्णपणे वाळली असून, ती काढून टाकण्याची गरज आहे. अशाच एका वाळलेल्या झाडाच्या फांदीमुळे एका युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची चर्चा या ठिकाणी असणाऱ्या लोकांमध्ये सुरू होती.

मदत नाही, फोटो काढले

धनाजी पोवार यांचा तीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला होता. येणारे-जाणारे लोक त्यांचे फोटो काढत होते. पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे नको, म्हणून कोणीही त्यांना मदत केली नाही. जर त्यांना वेळेत मदत झाली असती तर त्यांचा जीव वाचला असता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.